![]()
शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी निफाड शहर भाजपच्या वतीने बुधवारी (दि. ३०) नगरपंचायत कार्यालयासमोर टाळ वाजवत आंदोलन करण्यात आले. प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबतचे निवेदन नगरविकास मंत्री, जिल्हाधिकारी नाशिक, संचालक नगरपालिका प्रशासन, तहसीलदार निफाड, पोलिस निरीक्षक निफाड व मुख्याधिकारी निफाड नगरपंचायत यांना देण्यात आले. शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून, वारंवार मागणी करूनही ठोस कारवाई झालेली नाही. निफाडमधील बालक विराट कायस्थ याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला असून, त्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च नगरपंचायतीने करावा. तसेच २४ तासांच्या आत भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी विशेष मोहीम सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनस्थळी नगरपंचायतीच्या वतीने नगरअभियंता मयुरी नवले, कर व प्रशासकीय अधिकारी शरद बोडके, राहुल लामखेडे, नगर रचनाकार गौरव मोरे, जयसिंग ठाकरे आदी अधिकारी चर्चेसाठी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मुख्याधिकारी धीरज भामरे यांनी माजी नगराध्यक्ष मुकुंदराजे होळकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. या प्रकरणी लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी संजय कुंदे, नगरसेवक जावेद शेख, भाजपाचे निफाड मंडल प्रभारी संजय गाजरे, शहराध्यक्ष नवनाथ धारराव व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निफाडला कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी टाळ वाजवत आंदोलन करताना भाजपचे पदाधिकारी. भटके कुत्रे पकडणे व निर्बीजीकरणासाठी नगरपंचायतीने निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून, केवळ कार्यादेश देणे बाकी आहे. प्रक्रिया पूर्ण होताच तातडीने कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Source link
कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी टाळ वाजवा आंदाेलन:निफाड नगरपंचायतीकडून लवकरच कार्यवाहीचे लेखी आश्वासन; भाजपचे आंदोलन मागे