![]()
मृत्यूपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करून आपल्याला होत असलेल्या कथित त्रासाचा उल्लेख केला आणि त्यानंतर वैजापूर शहरातील नारंगी-सारंगी धरणात उडी घेऊन लोणी बुद्रुक येथील समाधान शिवाजी इंगळे (२५) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच्या मोबाईलमध्ये आढळलेल्या व्हिडिओमुळे या घटनेला गंभीर वळण मिळाले आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी राजू भानुदास रिठे (रा. लोणी बुद्रुक) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. बुधवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास समाधान यांनी नारंगी-सारंगी धरणात उडी घेतली. त्यांचा मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना विषारी औषधाची बाटली आणि समाधान यांचा मोबाईल आढळला. हे साहित्य जप्त करून मोबाईलची तपासणी केली असता आत्महत्येपूर्वी तयार केलेला व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये राजू रिठे याच्या कथित त्रासाला कंटाळून आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समाधान यांनी म्हटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याची बाबही तपासात पुढे आली आहे. २५ व्या वर्षी एका तरुण शेतकऱ्याचे आयुष्य अशा प्रकारे संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वैजापूर पोलिसांनी रिठे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
Source link
आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत तरुण शेतकऱ्याची धरणात उडी:लोणीच्या तरुणाची नारंगी-सारंगी धरणात आत्महत्या