![]()
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त पुणे ॲनिमल लिबरेशनच्या वतीने प्राणी हक्क, अहिंसा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी १७ किलोमीटरच्या सत्याग्रह पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत १२० हून अधिक तरुण, सजग नागरिक आणि प्राणीप्रेमींनी सहभाग घेतला. प्राण्यांवरील अत्याचार रोखणे, डेअरी उद्योगातील प्राण्यांच्या परिस्थितीबाबत जनजागृती करणे आणि वनस्पती-आधारित आहाराला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कोथरूड येथील गांधी भवन येथून सुरू झालेली ही पदयात्रा कर्वे पुतळा, डेक्कन, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रस्ता, पुणे महानगरपालिका मुख्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे येरवडा येथील ऐतिहासिक आगाखान पॅलेस येथे पोहोचली. पांढऱ्या वेशभूषेतील कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने पदयात्रा काढत नागरिकांचे लक्ष वेधले. या पदयात्रेदरम्यान विविध चौकांमध्ये प्राण्यांच्या वेदना, डेअरी उद्योगातील वास्तव आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाचे चित्रण करणारी खडू-कला साकारण्यात आली. या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. कार्यकर्त्यांनी पत्रकांचे वाटप करून विद्यार्थी, व्यावसायिक आणि नागरिकांशी संवाद साधला. भारतीय संविधानातील कलम ५१ अ (जी) नुसार सर्व सजीव प्राण्यांबद्दल दया बाळगण्याच्या कर्तव्याची आठवण करून देणे, तसेच प्राण्यांच्या हक्कांविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे, यावर या उपक्रमात भर देण्यात आला. आधुनिक पशुपालन आणि डेअरी उद्योगातील प्राण्यांच्या परिस्थितीबाबत जनजागृती करताना वनस्पती-आधारित आहाराचा पर्यायही मांडण्यात आला. प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन पदयात्रेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे विविध मागण्यांची निवेदने सादर करण्यात आली. प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक समिती सक्रिय करणे, शासकीय खरेदीमध्ये वनस्पती-आधारित आहाराला प्रोत्साहन देणे, तसेच अस्वच्छ व बेकायदेशीर मांसविक्री केंद्रांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, शैक्षणिक आणि व्यावसायिक संस्थांच्या कॅन्टीनमध्ये वनस्पती-आधारित खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे आणि विज्ञान प्रयोगशाळांमध्ये प्राण्यांच्या विच्छेदनाला पर्याय म्हणून डिजिटल सॉफ्टवेअरचा वापर करण्याची मागणीही करण्यात आली. या वेळी प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी प्राण्यांबद्दलची संवेदनशीलता ही केवळ वैयक्तिक आहारापुरती मर्यादित न राहता सामाजिक आणि प्रशासकीय धोरणांमध्येही प्रतिबिंबित व्हावी, असे मत व्यक्त केले. प्राण्यांचे हक्क, पर्यावरणाचे संरक्षण आणि मानवी आरोग्य हे परस्परांशी जोडलेले विषय असल्याचेही त्यांनी नमूद केले. आगाखान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी, महादेव देसाई आणि महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून सामूहिक अहिंसा संकल्पाने या सत्याग्रह पदयात्रेची सांगता झाली.
Source link
गांधी जयंतीला पुण्यात 17 किमी 'सत्याग्रह मार्च':प्राणी हक्क, अहिंसा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पदयात्रा