![]()
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुलतानाबाद येथील विद्यार्थ्यांनी गाव परिसरात स्वच्छता अभियान राबवत प्लास्टिक व कचरा गोळा केला. जमा केलेल्या कचऱ्याची होळी करून विद्यार्थ्यांनी ‘गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच’ असल्याचा संदेश ग्रामस्थांना दिला. या वेळी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक कारभारी गायके, सरपंच अनिता कारभारी गायके, उपसरपंच सोन्याबापू गायके, ग्रामपंचायत अधिकारी ए. आर राऊतराय, शालेय समितीचे अध्यक्ष गणपत बुटे, इसाक शेख, दत्तू गायके, बाबासाहेब गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांचे शाळेच्या वतीने सहशिक्षक दादासाहेब खैरे यांनी स्वागत करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले. यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. गांधीजींच्या स्वच्छतेविषयक विचारांची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले.‘स्वच्छता ही स्वातंत्र्यापेक्षाही महत्त्वाची आहे’ आणि ‘एक कदम स्वच्छता की ओर’ या संदेशातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. या अभियानात शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांसह गावातील शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
Source link
कौतुक:सुलतानाबादेत प्लास्टिक व कचऱ्याची होळी करून विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश