![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील सोयाबीन व कपाशीची पिके पाण्याअभावी पूर्णपणे करपून गेली आहेत. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट बनला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून दिवाळीपूर्वी थेट त्यांच्या बँक खात्यावर दुष्काळी अनुदान जमा करण्यात येईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि. २) गाढेजळगाव येथे दिली. बावनकुळे यांनी गाढेजळगाव परिसरातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री स्वतः बांधावर जाऊन पाहणी करत असल्याचे सांगत, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अचूक पंचनामे सादर करावेत, यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यंदा कपाशी व सोयाबीनचे उत्पादन घटून केवळ दीड ते दोन क्विंटलवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव मदत दिली जाईल. तसेच बँकांनी पीक कर्ज वसुली थांबवून नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि तलावांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. ‘वैरण विकास धोरणा’अंतर्गत पशुधनासाठी लवकरच चारा छावण्या सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार नारायण कुचे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीराम शेळके, सजनराव मते, तहसीलदार शिवानंद बिडवे, तालुका कृषी अधिकारी श्याम गुळवे, मंडळ अधिकारी संतोष लोळगे, राजेंद्र कवरे, रघुनाथ शेळके, संगीता उकर्डे, कृष्णा गट्टूवार, जि. प. सदस्य साधना कुळकर्णी, रवी कुळकर्णी, विठ्ठल सादरे, पं. स. सदस्य शंकर ठोंबरे, अर्जुन गाडेकर, कदीर सय्यद कंदील, अर्जुन उकर्डे, ज्ञानेश्वर सोळुंके यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन एकरांत केवळ एक-दोन क्विंटल सोयाबीन गाढेजळगाव येथील शेतकरी मंजूर उस्मान पठाण यांनी सांगितले की, गट क्रमांक ३७६ मध्ये त्यांच्या दोन एकर जमिनीत सोयाबीनची लागवड केली आहे. दरवर्षी एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन मिळते. मात्र यंदा दुष्काळामुळे केवळ एक ते दोन क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. पिकासाठी झालेला सुमारे ४० हजार रुपयांचा खर्चही भरून निघणार नसल्याचे त्यांनी सांगितले. भानुदास ठोंबरे यांच्या गट क्रमांक ४२६ मधील दोन एकर जमिनीत एक एकर कपाशी व एक एकर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. या पिकांवर सुमारे ४० ते ४५ हजार रुपये खर्च झाला. मात्र पाण्याअभावी संपूर्ण पीक करपून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
Source link
दुष्काळ पाहणी दौरा:दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार : मंत्री बावनकुळे