![]()
येथे ५३ व्या नाशिक जिल्हा कुमार गट मुले कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेला शुक्रवारी (दि. २) उत्साहात सुरुवात झाली. जय भवानी अद्ययावत व्यायामशाळेच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती पुरस्कार विजेते सुनील जाधव यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील ३२ संघांनी सहभाग घेतला आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात १६ संघांमध्ये साखळी पद्धतीने सामने झाले. त्यानंतर बाद फेरीतील संघ निश्चित करण्यात आले. मॅटवर प्रो-कबड्डीच्या धर्तीवर सामने खेळवले जात असल्याने खेळाडू आणि कबड्डीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. ४) सायंकाळी होणार असून, त्यानंतर पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुमार गट अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना राज्यस्तरावर संधी मिळवण्यासाठी आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. स्व. बाळासाहेब पाटील मित्र मंडळ, युवक क्रांती क्रीडा मंडळ मनमाड आणि जय भवानी अद्ययावत व्यायामशाळेच्या संयुक्त विद्यमाने, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी ठाणे जिल्ह्याचे प्रकाश लाड, मनमाडचे नगराध्यक्ष योगेश पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे, कैलास पाटील, आशिष पाटील, जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष पोपटलाल बेदमुथा आदी उपस्थित होते. स्पर्धा चुरशीची होईल, असा विश्वास प्रमुख संयोजक डॉ. दत्ता शिंपी यांनी व्यक्त केला. स्पर्धेच्या आयोजनासाठी सुनील जाधव, हनुमान महाडिक, सागर बांदेकर आदींचे सहकार्य लाभले. बाद फेरीसाठी पात्र संघ रुद्र (सिन्नर) विरुद्ध न्यू सिद्धी विनायक (ओझर), एनटीपीएस (एकलहरा) विरुद्ध ब्रह्मा (आडगाव), जय बजरंग (मोह) विरुद्ध स्वस्तिक (सिडको), युवा केपी (निफाड) विरुद्ध समर्थ (निफाड). या सामन्यांनंतर संबंधित संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले. आज त्यातून निवड केली जाणार आहे.
Source link
मनमाडमध्ये जिल्हास्तरीय कुमार गट कबड्डीचा थरार; 32 संघ मैदानात:उद्या अंतिम सामना; विजेत्यां खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी होणार निवड