![]()
महूद ते जुना हलदहिवडी रोडवर केवळ दिलीप केसकर यांच्या घराचा पत्ता विचारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघांवर काठीने व लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी (दि. १) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी नाना बिरा ढाळे व दत्ता लक्ष्मण माने (दोघे रा. ढाळेवाडी, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सदाशिव भारत खांडेकर (वय ४०, रा. लक्ष्मीनगर, ता. सांगोला) यांनी शुक्रवारी (दि. २) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खांडेकर हे त्यांचे मित्र नाथा विश्वनाथ लोखंडे यांच्यासोबत मोटारसायकलवरून केसकरवाडी येथे दिलीप केसकर यांच्या घरी चालले होते. महूद ते जुना हलदहिवडी रोडवरील प्रकाश भजनावळे यांच्या घराजवळ त्यांनी तेथील दोन व्यक्तींना दिलीप केसकर यांच्या घराचा पत्ता विचारला. पत्ता विचारल्याचा राग धरून दोन्ही संशयितांनी खांडेकर व लोखंडे यांना शिवीगाळ करत काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर “पोलिस ठाण्यात गेल्यास जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत संशयितांनी त्यांना दमदाटी केली. घटनेनंतर जखमींना तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. तेथून उपचार घेऊन परतल्यानंतर खांडेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
Source link
पत्ता विचारल्याच्या कारणावरून दोघांना काठीने बेदम मारहाण:ढाळेवाडीतील दोघांवर सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल