![]()
नागरिकांच्या नावावर बँक खाती उघडून त्यांचा ऑनलाइन आर्थिक फसवणुकीसाठी वापर करणाऱ्या टोळीचा वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. देशभरातील १९ नागरिकांची एकूण एक कोटी ८० लाख १५ हजार ७९५ रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली. श्रवण अंकुशे (वय २५), हरिओम हरिराम साहू (वय २४), सौद शेख (वय २३), साहील रौफ शेख (वय २५) आणि तालीब नुरमोहम्मद शेख (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी पुण्यातील धनगर वस्ती, साळुंके विहार आणि येरवडा परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, श्रवण अंकुशे हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. महाराष्ट्र सायबर, मुंबई यांच्याकडून ‘मनी ट्रेल’, संशयित बँक खाती आणि फसवणुकीच्या तक्रारींची माहिती वानवडी पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात आरोपींच्या नावावरील केवायसी कागदपत्रांच्या आधारे उघडलेल्या एका खात्यात सहा लाख नऊ हजार ७३० रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले. पुढील चौकशीत अन्य नागरिकांच्या फसवणुकीशी या खात्यांचा संबंध उघड झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नागरिकांची बँक खाती व्यवहारांसाठी मिळवून देण्याची जबाबदारी मुख्य आरोपीने हरिओम साहूकडे सोपवली होती. प्रत्येक खाते मिळवून दिल्यानंतर साहूला तीन हजार रुपये कमिशन, तर खातेदाराला पाच हजार रुपये मोबदला देण्याचे ठरले होते. या आमिषाने परिचित व्यक्तींची विविध बँकांमध्ये खाती उघडण्यात आली. खाती उघडल्यानंतर ती मुख्य आरोपीच्या वापरासाठी देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर या खात्यांचा ऑनलाइन फसवणुकीतील पैसे जमा करण्यासाठी वापर करण्यात आला. तपासादरम्यान आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर खातेदार, मध्यस्थ आणि मुख्य सूत्रधार यांच्यातील व्यवहारांची साखळी पोलिसांनी स्पष्ट केली आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५), तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी) अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग तपासातून निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे, उपनिरीक्षक शेख मोक्तार आणि समीरन उल्ले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा या कारवाईत सहभाग होता.
Source link
म्युल बँक खात्यांद्वारे पावणेदोन कोटींची फसवणूक:देशभरातील 19 नागरिकांना गंडा, पाच जणांना अटक