![]()
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य व न्याय्य दर मिळावा, यासाठी नांदेड जिल्ह्यात व्यापक शेतकरी आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला. उमरी तालुक्यातील इज्जतगाव येथील भवानी मंदिरात झालेल्या शेतकरी बैठकीत पंचक्रोशीतील शेकडो ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले. बालाजी गाडे पाटील आणि भगवान पाटील मनुरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत ऊसदरासह वजनकाटा, ऊसतोडणी, वाहतूक आणि ऊसतोड कामगारांच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडण्यात आली. ऊस उत्पादनासाठी लागणारी खते, औषधे, मजुरी, पाणी, वीज तसेच वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून यंदाच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांना पहिली उचल किमान ४ हजार रुपये प्रतिटन देण्यात यावी, अशी ठाम मागणी बैठकीत करण्यात आली. शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनात होणारी कथित काटामारी थांबवून वजनकाटे पारदर्शक करावेत, प्रत्येक वजनाची नोंद शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. लागवडीनंतर १२ महिन्यांच्या आत ऊसतोडणी पूर्ण करावी, ऊसतोडणीमध्ये भेदभाव करू नये आणि तोडणीचे नियोजन पारदर्शक पद्धतीने करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. याशिवाय ऊसतोड कामगारांच्या मजुरीत २५ टक्के वाढ करावी, त्यांना कारखान्यांकडून जीवन व अपघात विमा संरक्षण द्यावे, तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. तोडणी व वाहतूक खर्चातील कपातीची स्पष्ट माहिती शेतकऱ्यांना देऊन संपूर्ण व्यवहार पारदर्शक ठेवावा आणि एफआरपीची रक्कम कायद्यानुसार वेळेत अदा करावी, यावरही बैठकीत जोर देण्यात आला. साखर, इथेनॉल आणि इतर उपपदार्थांमधून निर्माण होणाऱ्या उत्पन्नाचा विचार ऊसदर निश्चित करताना करण्यात यावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. “काटामारी बंद झालीच पाहिजे; शेतकऱ्याच्या प्रत्येक टन उसाचा हिशोब मिळालाच पाहिजे,” अशी भूमिका बालाजी गाडे पाटील यांनी मांडली. ऊस उत्पादनासाठी शेतकरी वर्षभर मेहनत करतो. उत्पादन खर्च वाढत असताना कमी दर, ऊसतोडणीतील विलंब आणि वाहतुकीच्या नावाखाली होणाऱ्या कपातीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा पहिली उचल ४ हजार रुपये प्रतिटन मिळाली पाहिजे. मागण्या मान्य न झाल्यास नांदेड जिल्ह्यात व्यापक शेतकरी आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. भगवान पाटील मनुरकर यांनी ऊसदराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी पक्ष, गट आणि व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले. ऊस उत्पादकांसोबतच ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांनाही न्याय मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ऊसदराचा प्रश्न गावागावात नेऊन जनजागृती करण्याचा तसेच आगामी काळात जिल्हाभर शेतकरी बैठका घेण्याचा निर्धार उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला. ४ हजार रुपयांची पहिली उचल, वजनकाट्यातील पारदर्शकता, १२ महिन्यांच्या आत ऊसतोडणी, ऊसतोड कामगारांना न्याय आणि ऊस व्यवहारातील पारदर्शकता या मागण्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनाची दिशा या बैठकीत निश्चित करण्यात आली.
Source link
ऊसदरवाढीसाठी नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा एल्गार:पहिली उचल 4 हजार रुपये प्रतिटन देण्याची मागणी; काटामारी, ऊसतोडणी व वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकतेसाठी आंदोलनाची हाक