Headlines

दुष्काळ, पीकविम्यासह 12 मागण्यांसाठी मुखेडमध्ये साखळी उपोषण:माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बेटमोगरेकरांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन




मुखेड तालुक्याचा Trigger-1 दुष्काळ यादीत समावेश झाल्याचा शासन निर्णय (GR) तातडीने काढावा, पीकविमा मंजुरीसाठी खरीप २०२६ पासून लागू केलेली सेटेलाईटद्वारे ५० टक्के भारांकनाची अट रद्द करावी, यासह विद्यार्थी, मजूर, महिला आणि शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी मुखेड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वर्ताळा गणातील शेतकऱ्यांच्या सहभागाने आंदोलनाला सुरुवात झाली. मुखेड तालुक्याचा Trigger-1 मधून समावेश करावा, या मागणीसाठी १ ऑक्टोबर रोजी तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी मुखेड तालुक्याचा Trigger-1 मध्ये समावेश करणारा शासन निर्णय तातडीने काढण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप शासन निर्णय जारी झालेला नसल्याने शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा पुढील टप्पा सुरू केला आहे. मुखेड तहसील कार्यालयासमोर सुरू झालेले हे साखळी उपोषण व धरणे आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. दररोज तालुक्यातील वेगवेगळ्या गणांतील शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी वर्ताळा गणातील शेकडो शेतकऱ्यांनी स्वाक्षरी करून आंदोलनातील मागण्यांना पाठिंबा दिला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत, पीकविमा आणि इतर मागण्यांबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *