Headlines

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शिवसृष्टीला भेट दिली:पुणे येथील शिवसृष्टी प्रकल्पाचे कौतुक करत विजेत्यांना बक्षिसे वाटली




महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज भेट दिली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, शिवसृष्टीचे विश्वस्त जगदीश कदम व विनीत कुबेर, सल्लागार मनोज पोचट व संदीप जाधव, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार व ऋचा लिमये गिरगावकर उपस्थित होते. शिवसृष्टीची माहिती महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींपर्यंत पोहोचावी यादृष्टीने घेण्यात आलेल्या शिवसृष्टीवर व्हिडीओ तयार करण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांना बागडे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेत सिद्धेश चव्हाण यांनी प्रथम, धीरज हेमगुडे यांनी द्वितीय तर समृद्धी मुंगसे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. कादंबरी अकोलकर, आदिनाथ कनके, आरुष शर्मा व हर्षदा देसाई यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. यावेळी बोलताना हरिभाऊ बागडे म्हणाले की, शिवसृष्टी हे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावारूपाला येईल, लोक येथे आवर्जून भेट देतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व त्यांची राज्य करण्याची पद्धत समजून घेतील. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील घराघरात शिवचरित्र पोहोचवण्यासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांनी १९६० – ६१ पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्याख्याने दिली. या व्याख्यानांमुळे लोकांमध्ये शिवरायांबद्दलची माहिती अधिक रुजली. शिवसृष्टी पाहून अतिशय आनंद झाला व समाधान वाटल्याचे सांगत, बागडे यांनी शिवसृष्टी प्रकल्पाचे कौतुक केले. ज्या शिवछत्रपतींना जगात तोड नाही, अशा राजाचा इतिहास आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या प्रकल्पाच्या प्रसारासाठी आणि पुढील कामासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. प्रास्ताविक करताना जगदीश कदम म्हणाले की, पाच टप्यात साकारणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पात रुपये ४३८ कोटी इतकी गुंतवणूक केली जाणार आहे. आज २ टप्पे पूर्ण होवून त्याचे लोकार्पण झाले आहे. पुढील वर्षी शिवजयंतीला तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्याची योजना असल्याचे सांगत कदम म्हणाले की २०२८ पर्यंत शिवसृष्टी प्रकल्पाच्या ५ टप्प्यांचे काम पूर्ण करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या आमचा मानस आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *