![]()
पं. राम मराठे यांना मराठे कुटुंबीयांकडून गायन, वादन आणि नृत्याविष्कारातून सांगितीक मानवंदना देण्यात आली. दोन सत्रात आयोजित करण्यात आलेल्या संगीत संमेलनात युवा आणि ज्येष्ठ अशा नऊ कलाकारांनी सादरीकरण केले. गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे पं. राम मराठे स्मृती संगीत संमेलनाचे शनिवार पेठेतील महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजन करण्यात आले होते. श्रीकांत मराठे, नीलिमा मराठे, विजय मराठे, प्राचार्य पं. प्रमोद मराठे, उपप्राचार्य परिणिता मराठे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. पं. मुकुंद राम मराठे, मधुरा मराठे-गोडबोले, धनंजय मराठे, मुकुंद अनंत मराठे, वसंत मराठे यांचे शास्त्रीय गायन, पं. प्रमोद मराठे, पराग मराठे, रोहित मराठे यांचे संवादिनी वादन तर सृष्टी मराठे-नेलगे यांनी कथक नृत्याविष्कार साकारला. कलाकारांना अभिजित जायदे, केदार टिकेकर, समीर मोडक (तबला), सुखदा खिरे, पं. प्रमोद मराठे, निलय साळवी (संवादिनी) यांनी साथसंगत केली. मंजिरी मराठे यांचे निवेदन होते. पहिल्या सत्राची सुरुवात युवा शास्त्रीय गायिका मधुरा मराठे-गोडबोले यांच्या राग नटभैरवच्या सादरीकरणाने झाली. या नंतर त्यांनी पावसचे स्वामी स्वरूपानंद यांची ‘गुरुकृपेविण नाही आत्मभान’ ही भक्तीरचना सादर केली. धनंजय मराठे यांनी गायन मैफलीत राग मियाँ कि तोडीचे सुमधूर सादरीकरण केले. पं. प्रमोद मराठे यांनी संवादिनी वादनाची सुरुवात राग भीमपलासने केली. त्यानंतर मिश्र पहाडीमधील जोड रागांची धून ऐकविली. त्यानंतर मुकुंद अनंत मराठे यांनी राग देसीमधील ख्याल ऐकविला. पहिल्या सत्राची सांगता सृष्टी मराठे-नेलगे यांच्या कथक नृत्याविष्काराने झाली. सायंकाळच्या सत्राची सुरुवात पराग मराठे यांनी संवादिनीवर सादर केलेल्या राग चारुकेशीने झाली. त्यानंतर वसंत श्रीराम मराठे यांनी त्रिवेणी हा अनवट राग सादर करून रसिकांना प्रभावित केले. तसेच भेंडी बझार घराण्याची बंदिश सादर करून पंडित अभिषेकीबुवा यांची ‘विश्वाचा विश्राम रे’ ही रचना ऐकविली. रोहित मराठे यांनी संवादिनी वादनातून राग बिहाग साकारला. तसेच सात रागांनी युक्त रागमाला सादर केली. पंडित मुकुंद राम मराठे यांनी आपल्या गायनाची सुरुवात ‘रसिया आओ ना’ या राग मारुबिहागमधील बंदिशीने केली. विविध अनवट आणि जोडरागांची झलक ऐकवून पं. राम मराठे यांच्या गायकीवे वैशिष्ट्य दर्शवत त्यांनी संमेलनाचा समारोप केला.
Source link
पं. राम मराठे यांना मराठे कुटुंबीयांकडून सांगितीक मानवंदना:नऊ युवा आणि ज्येष्ठ कलाकारांनी गायन, वादन, नृत्यातून सादरीकरण केले