मच्छिमार बांधव हे मुंबईचे मूळ रहिवासी असून मच्छिमारांसह कष्टकरी आणि सर्वसामान्य घटकांसाठी आगामी काळात मुंबई बँकेमार्फत विशेष योजना आणण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. अनुशक्तीनगर येथील मुंब
.
ट्रॉम्बे, अनुशक्तीनगर आणि परिसरात कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक, निवृत्त व्यक्ती तसेच मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव वास्तव्यास आहेत. या घटकांना बँकिंग सेवा सहज आणि सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी नवीन शाखा महत्त्वाची ठरणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय आणि खासगी बँकांपेक्षा मुंबई बँकेला अधिक प्रतिसाद मिळेल
प्रवीण दरेकर म्हणाले, “सर्वसामान्य घटकाला ज्यावेळी मदतीची गरज असते, त्यावेळी त्याला सहज कर्ज आणि बँकिंग सुविधा मिळणे आवश्यक आहे. या शाखेच्या माध्यमातून ग्राहकांना अडचणीच्या काळात सुलभ व्यवस्था उपलब्ध करून दिली, तर राष्ट्रीय आणि खासगी बँकांपेक्षा मुंबई जिल्हा बँकेला अधिक प्रतिसाद मिळेल.”
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक मोठ्या संस्था आणि कंपन्या मुंबईत व्यवसाय करतात; मात्र मुंबईकरांना गरज असताना त्यांच्या मदतीला कोण उभे राहते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीच्या काळात मुंबई बँक त्यांच्या पाठीशी उभी राहिली असल्याचे दरेकर यांनी नमूद केले.
गिरणी कामगार, माथाडी कामगार, शिक्षक आणि पोलिसांना घरांसाठी कर्ज देण्याचे काम मुंबई बँकेने केले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन बँकेच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिलांना 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज
मुंबई बँकेने महिलांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. आतापर्यंत 2 ते 2.5 हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती दरेकर यांनी दिली.
“इतर बँकांचा मुख्य उद्देश व्यवसाय आणि ठेवी वाढवणे असतो. मात्र मुंबई बँक सभासद आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या ठेवी जमा करून त्यांच्या उत्कर्षासाठी काम करण्याचा प्रयत्न करते,” असे दरेकर म्हणाले.
‘मोठ्या कर्जदारांना वेगळी, सर्वसामान्यांना वेगळी वागणूक का?’
कर्जाच्या थकबाकीच्या मुद्द्यावरही दरेकर यांनी भाष्य केले. “सर्वसामान्य माणूस कर्जाचा एक रुपयाही थकवत नाही. विजय मल्ल्यासारखी मोठी लोकं हजारो कोटींचे कर्ज थकवतात. मात्र मोठ्या कर्जदारांच्या थकबाकीसाठी एनपीएची तरतूद करण्यासाठी बजेटमधून पैसे दिले जातात. दुसरीकडे सर्वसामान्यांचे 25-50 हजार रुपये थकले, तर एनपीएची तरतूद नफ्यातून करण्यास सांगितले जाते. हा विपर्यास थांबण्याची गरज आहे,” असे दरेकर यांनी सांगितले.
हा विषय आपण सातत्याने विधिमंडळात मांडत आलो असून भविष्यात सहकार क्षेत्रात या मुद्द्यावर चळवळ उभी करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘पुढील पंचवार्षिक संपण्यापूर्वी 25 हजार कोटींचा टप्पा गाठणार’
मुंबई बँकेच्या आगामी विस्ताराची माहिती देताना दरेकर यांनी मोठे लक्ष्य जाहीर केले. “गेली 25 वर्षे संचालक मंडळाने बँकेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. अनेक आरोप, टीका आणि संकटे आली; मात्र त्यातून विचलित न होता बँक मोठी झाली पाहिजे आणि तिचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे, या उद्देशाने काम केले,” असे ते म्हणाले.
आज मुंबई बँकेची उलाढाल 15-16 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. बँकेच्या माध्यमातून स्वयं पुनर्विकासाची योजनाही आणण्यात आली आहे. गृहनिर्माण संस्थांनी स्वतःची इमारत उभी केल्यास विकासकाच्या माध्यमातून मिळणाऱ्या जागेपेक्षा अधिक जागा या योजनेतून मिळू शकते, असा दावा दरेकर यांनी केला.
“अशा धाडसी निर्णयांचा फायदा कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. आगामी काळात मुंबई बँक झपाट्याने वाढणार असून पुढील पंचवार्षिक संपण्यापूर्वी 25 हजार कोटींचा टप्पा मुंबई बँक पार केल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.
घाटले गावातही शाखा सुरू करण्याची मागणी
यावेळी आमदार तुकाराम काते यांनी मुंबई जिल्हा बँकेच्या कामाचे कौतुक केले. चेंबूरमधील घाटले गाव परिसरात सध्या बँकेची शाखा नसल्याने नागरिकांना बँकिंग व्यवहारांसाठी गोवंडी येथे जावे लागते. त्यामुळे घाटले गाव येथेही मुंबई बँकेची शाखा सुरू करावी, अशी मागणी काते यांनी केली.
अनुशक्तीनगरमध्ये सुरू झालेली नवीन शाखा परिसरातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल. मुंबई बँक मराठी माणसांसाठी असून नागरिकांनी बँकेच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या उद्घाटन कार्यक्रमाला मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, संचालक नंदकुमार काटकर, संदीप घनदाट, विठ्ठल भोसले, जिजाबा पवार, अनिल गजरे, विष्णू घुमरे, कविता देशमुख, तेजस्वी घोसाळकर, बँकेचे कार्यकारी संचालक संदीप सुर्वे तसेच बीएआरसीचे पदाधिकारी विवेक डोळस, शिवाजी हनवते, हेमंत कोळी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा…
एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट:तासभर चर्चा, दुष्काळावरही झाली चर्चा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. आगामी विधान परिषद निवडणुका, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. तसेच संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातही या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सविस्तर वाचा…