Headlines

आगीत गंभीर भाजलेल्या कर्मचाऱ्यांना पालिका देणार प्रत्येकी 1 लाखांची मदत:नगराध्यक्षा रेखा बांगर यांची घोषणा




हिंगोली शहरातील कपडागल्ली भागात आगीवर नियंत्रण मिळवितांना गंभीररित्या भाजलेल्या पालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा पालिकेच्या नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर यांनी केली आहे. हिंगोली शहरातील कपडागल्ली भागात फटाक्याच्या गोदामाला आग लागली. ज्या भागात आग लागली त्या भागातील रस्ते अगदीच अरूंद आहेत. मात्र या परिस्थितीतही पालिकेच्या अग्नीशमनदलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लहान वाहने घेऊन घटनास्थळी गाठले. त्या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवित असतांना अग्नीशमनदलाचे कर्मचारी रवी कांबळे, अक्षय सांगळे, दिलीप दोडके गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे या आगीवर नियंत्रण मिळवितांना अग्नीशमनदलाचे वाहन देखील जळाले. त्यावरूनच आगीची तिव्रता लक्षात येते. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या तीनही कर्मचाऱ्यांवर हिंगोलीच्या लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पीटलमध्ये डॉ. अखील अग्रवाल, डॉ. मयूर अग्रवाल यांच्या पथकाने तातडीने उपचार केले. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी जखमी कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लातुर येथे हलविले आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांची प्रकृती लक्षात घेता त्यांची तब्येत सुधारण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत तसेच आर्थिक अडचण भासू नये यासाठी त्यांच्या उपचारासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर यांनी केली आहे. सदर मदत तातडीने त्यांच्या कुटुंबाकडे सुपुर्द केली जाणार आहे. या शिवाय कर्मचाऱ्यांच्या तब्येतीकडे पालिका प्रशासन सतत लक्ष ठेऊन असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- श्रीराम बांगर, गटनेते हिंगोली पालिका अग्नीशमनदलाच्या या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या कर्मचाऱ्यांना पालिका वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आवश्‍यक ती मदत केली जाईल. त्यांच्या उपचारासाठी मोठ्या शहरात नेण्याची गरज भासल्यास त्या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *