Headlines

नांदेडमध्ये एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला:भररस्त्यात धारदार शस्त्राने सपासप वार; नागरिकांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ




राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, कालच सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेची शाई वाळण्यापूर्वीच आता नांदेडमधून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडमध्ये एका माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून कॉलेजवरून घरी परतणाऱ्या 12 वीच्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेने संपूर्ण नांदेड शहरात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पोहरे असे या हल्लेखोर तरुणाचे नाव असून तो गेल्या दोन वर्षांपासून या पीडित विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. काल ती आपल्या मैत्रिणीसोबत कॉलेजवरून घरी परतत असताना रोहितने तिला वाटेतच अडवले आणि बोलण्याचा आग्रह धरला. मात्र, मुलीने त्याला बोलण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने, संतापलेल्या रोहितने थेट तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत तिला गंभीर जखमी केले. नागरिकांनी तत्परतेने धाव घेत मुलीची सुटका केली सुदैवाने, हल्ला होताच तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेऊन या तरुणीची हल्लेखोराच्या तावडीतून सुटका केली. नागरिकांनी मोठ्या धैर्याने हल्लेखोर रोहितला जागेवरच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात तरुणीच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर शस्त्राचे गंभीर वार झाले आहेत. पोलिसांनी मध्यरात्रीच रोहितवर ‘पॉक्सो’ आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कठोर कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पीडितेच्या आईचा आक्रोश या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आरोपी गेल्या दोन वर्षांपासून माझ्या मुलीला त्रास देत होता. आम्ही त्याच्या घरच्यांनाही जाऊन समजावले होते आणि सांगितले होते की, आम्हाला आमच्या मुलीला खूप शिकवायचे आहे. तो जीव देण्याच्या धमक्या द्यायचा, पण तो असा थेट हल्ला करेल याची आम्हाला सुतराम कल्पना नव्हती,” असे सांगत त्यांनी आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. वाढत्या हिंसक प्रवृत्तीवर मानसोपचारतज्ज्ञांची चिंता नांदेडच्या या घटनेने महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुदैवाने पीडित तरुणीची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दी. बा. जोशी म्हणाले की, “तरुणांमध्ये हिंसक विचार वाढत असून सहिष्णुता कमी होत चालली आहे. ‘जिच्यावर प्रेम करतो, ती आपला हक्क आहे’ ही विकृत भावना अतिशय धोकादायक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या विकृत मनोवृत्तीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असून अशांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *