Headlines

दादर ते नवी मुंबई विमानतळ एसटी बससेवा उद्यापासून:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते सेवेला प्रारंभ, अटलसेतूमार्गे धावणार बस




नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी थेट बससेवा उद्या, 7 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. ही बससेवा अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटलसेतूमार्गे धावणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होत असताना मुंबई आणि विमानतळादरम्यान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच भाग म्हणून एसटीने थेट विमानतळ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दादर हे मुंबईतील महत्त्वाचे रेल्वे आणि बस वाहतुकीचे केंद्र असल्याने या ठिकाणाहून थेट विमानतळापर्यंत बस उपलब्ध झाल्यामुळे मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, अटलसेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक वेगाने करता येणार आहे. त्यामुळे विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहन, टॅक्सी किंवा इतर पर्यायांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. एसटीची बससेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी तुलनेने सोयीची आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणार आहे. दादरबरोबरच बोरिवली ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि स्वारगेट ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मार्गांवरही एसटी बससेवा सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईसह पुणे आणि उपनगरांमधून विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना थेट बसचा पर्याय मिळणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यामध्ये एसटीची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. विमानतळाला एसटीच्या राज्यभर पसरलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी जोडल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, विद्यार्थी आणि विमानप्रवाशांना सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासाची सुविधा मिळेल. एसटी महामंडळाची ‘लालपरी’ राज्याच्या बहुतांश भागात पोहोचली आहे. या नेटवर्कचा उपयोग करून नवी मुंबई विमानतळाशी विविध शहरांना जोडण्याचे नियोजन केले जात आहे. भविष्यात प्रवाशांची गरज आणि विमानतळावरील वाहतुकीचा प्रतिसाद लक्षात घेऊन आणखी मार्गांवर बससेवा सुरू करण्याची शक्यता आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीचे चित्र बदलण्याची अपेक्षा आहे. विमानतळावर मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करणार असल्याने त्यांना विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचे अधिक पर्याय उपलब्ध असणे आवश्यक आहे. एसटीची थेट बससेवा या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. दादर, बोरिवली आणि पुण्यातील स्वारगेट या महत्त्वाच्या ठिकाणांहून थेट बससेवा उपलब्ध झाल्याने प्रवाशांना सामानासह वारंवार वाहन बदलण्याची कटकट कमी होणार आहे. विशेषतः विमानप्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, कुटुंबासह प्रवास करणारे प्रवासी आणि बाहेरगावाहून मुंबईत येणाऱ्यांसाठी ही सेवा उपयोगी ठरणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विमानतळाशी जोडण्याच्या दृष्टीने एसटीच्या या सेवेला महत्त्व प्राप्त झाले आहे. सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ प्रवासाची सुविधा देण्यावर एसटी महामंडळाचा भर असून, विमानतळाच्या वाढत्या प्रवासी संख्येनुसार बससेवेचा विस्तार करण्याचे नियोजन असल्याचेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. हेही वाचा… सातारा जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल:उदयनराजे भोसले संचालकपदी बिनविरोध, ज्ञानेश्वर पवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला राज्यात विविध निवडणुकांची तयारी सुरू असतानाच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महत्त्वाची घडामोड घडली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात अर्ज दाखल करणारे ज्ञानेश्वर पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उदयनराजेंचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीतील पहिला गुलाल साताऱ्यात उधळला गेला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *