Headlines

पुरुषोत्तम जगतापांवर राष्ट्रवादीची कारवाई होणार:अजित पवारांचा फोटो-आवाज वापरल्याने जय पवारांचा थेट इशारा




सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कारखाना निवडणुकीत स्वतंत्र भूमिका घेतलेल्या पुरुषोत्तम जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडताना जगताप यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो तसेच आवाजाचा वापर प्रचारासाठी केल्याचा आरोप केला आहे. सुरुवातीला पुरुषोत्तम जगताप यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका पक्षाने घेतली होती. मात्र, त्यानंतर प्रचारात अजित पवार यांचे नाव, छायाचित्र तसेच सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित व्हिडिओ आणि अजित पवार यांच्या आवाजाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने पक्षाला कारवाई करणे भाग पडत असल्याचे जय पवार यांनी सांगितले. यापूर्वी पत्रकारांनी जगताप यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला असता आपण कारवाई करणार नसल्याचे सांगितले होते. त्यावेळी जगताप यांना अजित पवार यांचे नाव आणि छायाचित्र वापरू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही प्रचारामध्ये पवार कुटुंबीयांच्या संदर्भातील सामग्रीचा वापर झाल्याचा दावा जय पवार यांनी केला. आज सायंकाळपर्यंत कारवाईचे स्वरूप स्पष्ट होणार पुरुषोत्तम जगताप यांच्यावर नेमकी कोणती कारवाई केली जाणार, याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. याबाबतची भूमिका आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता जय पवार यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, जगताप यांच्यासोबत गेलेल्या इतर पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांवर मात्र कारवाई केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगताप यांच्या भूमिकेमुळेच सध्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने कारवाईचा निर्णय मुख्यत्वे त्यांच्यापुरताच मर्यादित राहणार असल्याचे जय पवार यांनी सांगितले. त्यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणखी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगताप यांची भूमिका आधीपासूनच ठरलेली होती? सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून भाजपच्या स्थानिक संघटनेमध्ये फूट पाडून बारामतीच्या सहकार क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न जय पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जय पवार यांच्या म्हणण्यानुसार, 28 तारखेला पुरुषोत्तम जगताप यांनी काही नावे घेऊन पक्षातील नेत्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याशीही याबाबत चर्चा झाली. पुढील दिवशी पहाटेपर्यंत बैठका झाल्या आणि नवीन पॅनेल तयार करण्यासंदर्भात चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर जगताप यांच्या प्रचारातील हालचाली आणि दौरे पाहता त्यांची स्वतंत्र भूमिका आधीपासूनच ठरलेली असावी, असा संशय जय पवार यांनी व्यक्त केला. ‘उमेश पाटील यांचा या पॅनेलमध्ये कोणताही रोल नाही’ सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत तयार करण्यात आलेल्या पॅनेलमध्ये अनेक घटकांचा समावेश करण्यात आला असून, हा निर्णय सर्वसमावेशक पद्धतीने घेण्यात आल्याचे जय पवार यांनी स्पष्ट केले. या प्रक्रियेत उमेश पाटील यांची कोणतीही भूमिका नसल्याचेही त्यांनी सांगितले. सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी एकत्रितपणे पॅनेल तयार केले असून, कारखाना सक्षमपणे आणि व्यवस्थितपणे चालवणे हा या पॅनेलचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याच्या कारभारात भविष्यात काही त्रुटी राहिल्यास त्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली. ‘लोकसभेपेक्षाही अधिक गर्दी प्रचारात’ सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसादही जय पवार यांनी अधोरेखित केला. सध्याच्या प्रचारात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होत असून, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या तुलनेतही प्रचारातील उत्साह अधिक असल्याचा दावा त्यांनी केला. प्रचारादरम्यान नागरिकांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आपलेपणा दिसत असल्याचे जय पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साथ दिली होती; मात्र त्याच काळात हेच कार्यकर्ते आणि नागरिक राष्ट्रवादीच्या इतर गटांसोबतही जोडलेले होते, असे त्यांनी नमूद केले. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून, पुरुषोत्तम जगताप यांच्यावर होणाऱ्या संभाव्य कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते आणि त्याचा निवडणुकीच्या समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा… सातारा जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल:उदयनराजे भोसले संचालकपदी बिनविरोध, ज्ञानेश्वर पवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला राज्यात विविध निवडणुकांची तयारी सुरू असतानाच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महत्त्वाची घडामोड घडली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात अर्ज दाखल करणारे ज्ञानेश्वर पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उदयनराजेंचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीतील पहिला गुलाल साताऱ्यात उधळला गेला आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *