![]()
फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्ष येथे दुष्काळग्रस्त पिकांच्या पंचनाम्यावरून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनातर्फे पिकांचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाला ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आक्रमक विरोध करत माघारी धाडले. सोमवारी सकाळी सहाय्यक कृषी अधिकारी कैलास चौधरी आणि ग्रामविकास अधिकारी जी. एस. गावंडे हे कर्मचारी पूर्ण शिवारातील पिकांचा पंचनामा करण्यासाठी गावात दाखल झाले होते. मात्र, अधिकाऱ्यांचे आगमन होताच संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कोणत्याही परिस्थितीत पंचनामा होऊ देणार नसल्याची ठाम भूमिका घेतली. यावेळी खामगावचे सरपंच सोमीनाथ पाटील सोनवणे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना खडसावले. संपूर्ण शिवारातील पिके दुष्काळामुळे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. अशा गंभीर परिस्थितीत केवळ औपचारिक पंचनामा करून अन् फोटो काढून निघून जाणे म्हणजे हवालदिल शेतकऱ्यांची उघड्या डोळ्यांनी थट्टा करण्यासारखे आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. तसेच, जोपर्यंत सर्व पीकधारकांना महाराष्ट्र शासनाकडून १०० टक्के अनुदान जाहीर होत नाही, तोपर्यंत गावात कोणताही पंचनामा करू दिला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनात सरपंच सोमीनाथ सोनवणे, सोसायटी चेअरमन बाबासाहेब सोनवणे, उपसभापती आजिनाथ सोनवणे, व्हाईस चेअरमन आयुब शेख, विष्णू सोनवणे, जगन्नाथ सोनवणे, बंडू सोनवणे, सुरेश सोनवणे, अण्णा सोनवणे, भरत सोनवणे आणि रोशन म्हस्के यांच्यासह शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांचा हा आक्रमक पवित्रा पाहून कृषी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना पंचनामा न करताच माघारी फिरावे लागले.
Source link
खामगाव गोरक्ष येथे दुष्काळी पंचनाम्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; अधिकारी परतले:नुकसानग्रस्तांना सरसकट आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी