Headlines

गारमाळला पश्चिम भागातील 10 गावांसाठी टँकरचे लोकार्पण:डिसेंबरअखेर आणखी 40 गावांना टँकर : आमदार बोरसे‎




गारमाळ येथे पश्चिम भागातील १० गावांसाठी आमदार निधीतून टँकरचे लोकार्पण करण्यात आले. बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर पश्चिम भागातील पाणीटंचाई लक्षात घेता डिसेंबरअखेर आणखी ४० गावांना पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली. आदिवासी जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल, कृषी तसेच अन्य विभागांच्या माध्यमातून आढावा घेण्यात येणार आहे. पात्र नागरिक योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पावले उचलण्याच्या सूचना आमदार बोरसे यांनी ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांना दिल्या. दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नियोजन करावे. लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम काटकसरीने आयोजित करून पाण्याची बचत करावी, असे आवाहन बोरसे यांनी केले. राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत आदिवासी महिलांचे बचत गट स्थापन करून पाच लाख रुपयांपर्यंतच्या अनुदानातून उद्योग व व्यवसाय उभारता येतील. यासाठी आदिवासी विकास प्रकल्पामार्फत मार्गदर्शन मिळेल,असे बोरसे यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधत बोरसे यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कार्यक्रमास बागलाण विधानसभा प्रमुख पंकज ठाकरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती मधुकर ठाकरे, नारायण सूर्यवंशी, मधुकर चौधरी, कैलास ठाकरे, बाबुराव बागुल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सोमनाथ सूर्यवंशी यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *