Headlines

मैफल:कवितांतून शेती, माणुसकीसह उमटले नात्यांचे भावस्पर्शी संवेदनशील विश्व




जोतिबा फुले यांचा सामाजिक संघर्ष, दुष्काळाच्या काळात पावसासाठी शेतकऱ्यांची आर्जव, बापाचे कुटुंबातील स्थान आणि शेतकरी-शेतमजुरांच्या स्थलांतराचे वास्तव अशा विविध विषयांचे संवेदनशील चित्रण निफाड येथे झालेल्या राज्यस्तरीय कवी संमेलनात कवितांमधून उमटले. राज्यभरातून आलेल्या ८० कवींनी शेती व शेतकरी, माणुसकी, आई, स्त्रीजीवन, नाती, निसर्ग आणि मानवता अशा विविध विषयांवरील कविता सादर करत काव्यमैफिल रंगवली. माणुसकी सामाजिक फाउंडेशनच्या अध्यक्ष आरती सागर निकाळे यांच्या वतीने या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या काव्यमैफिलीत कवींनी सामाजिक वास्तव आणि मानवी भावभावनांना शब्दरूप दिले. कवी राजेंद्र सोमवंशी यांनी सामाजिक विषयाचे भान जपत जोतिबा फुले यांच्या संघर्षाचे चित्रण कवितेतून केले. सत्यासाठी लढणारे, अन्यायाविरुद्ध झुंजणारे आणि समानता व शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ज्योतिबा यांच्या कार्याचा सामाजिक संदेश त्यांच्या कवितेतून उमटला. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कवी प्रशांत केंदळे यांनी ‘गुलमोहराचं कुकू’ या कवितेतून पाऊस आणि मातीचे नाते मांडले. कवयित्री शीतल कुयटे यांनी ‘बापमाणूस’ या कवितेतून आयुष्याचा आधार असलेल्या बापाचे थोरपण उलगडले. बाप म्हणजे काळाच्या मनगटातील न दिसणारी नाडी असून, ती थांबल्यावर जगणे कशावर टेकले होते, याची जाणीव होते, असा आशय त्यांच्या कवितेतून मांडला. कवी दशरथ झनकर यांनी शेतकरी व शेतमजुरांचे दुःख आणि स्थलांतराचे वास्तव कवितेतून मांडले. पाठीवर बिऱ्हाड घेऊन रानोमाळ भटकणारे, मिळेल ते खाणारे आणि तांड्यावर राहून कष्टाने पैसा जमवून घराकडे पाठवणारे शेतकरी-शेतमजूर यांचे वास्तववादी चित्रण त्यांच्या कवितेतून साकारले. बक्षीस वितरण नगरसेविका दीपाली गीते यांच्या हस्ते झाले. स्वागत सागर निकाळे यांनी केले. अध्यक्षस्थानी भाऊसाहेब भवर होते. प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, शिवाजी ढेपले, संपत रोटे, नामदेव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. आभार सागर निकाळे यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *