![]()
पुण्याची ओपन वॉटर जलतरणपटू गीता महेश मालुसरे हिने अवघ्या ९६ दिवसांत इंग्लिश चॅनेल, कॅटालिना चॅनेल आणि न्यूयॉर्कमधील २० ब्रिजेस स्विम ही तीन खडतर जलतरण आव्हाने पूर्ण करून ‘ओपन वॉटर स्विमिंग ट्रिपल क्राउन’ पटकावला आहे. ही कामगिरी करणारी गीता भारतातील पहिली महिला जलतरणपटू ठरली आहे. कमी कालावधीत ट्रिपल क्राउन मिळविणारी ती जगातील सहावी आणि आशियातील दुसरी महिला ठरली आहे. गीता यांनी ‘क्वीन ऑफ ओशन’ हा बहुमान मिळविण्याचे ध्येय ठेवले असून, जगातील सात प्रमुख खाड्या पोहण्याच्या या मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांच्या प्रवासाची सुरुवात इंग्लिश चॅनेलपासून झाली. जेलीफिशच्या दंशामुळे आलेल्या अडथळ्यानंतरही त्यांनी जिद्दीने पुन्हा सराव सुरू केला. यानंतर अमेरिकेतील कॅटालिना चॅनेल त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत १५ तास ४२ मिनिटांत पार केले. या जलतरणादरम्यान दोन्ही हातांना दुखापत झाली होती. मात्र, वेदना आणि अडचणींवर मात करत त्यांनी हे आव्हान पूर्ण केले. कॅटालिना चॅनेल पूर्ण करणाऱ्या त्या भारतातील पाचव्या महिला ठरल्या होत्या. न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन बेटाभोवतीची सुमारे ४६ किलोमीटरची २० ब्रिजेस स्विम त्यांनी नुकतीच ९ तास ३२ मिनिटांत पूर्ण केली. त्यामुळे तीनही आव्हाने पूर्ण करून त्यांनी ट्रिपल क्राउनवर नाव कोरले. “प्रत्येक स्विमने मला नवा धडा दिला आणि मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत केले. हे यश केवळ माझे नाही; माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या कुटुंबीय, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे हा प्रवास शक्य झाला,” असे गीता यांनी सांगितले. या प्रवासात कुटुंबीयांसह प्रशिक्षक प्रतीक जावडेकर, शेखर खासनीस, तसेच अमेरिकेतील सहकाऱ्यांनी दिलेल्या मदतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
Source link
गीता मालुसरेने 96 दिवसांत 'ट्रिपल क्राउन' पटकावला:इंग्लिश चॅनेल, कॅटालिना चॅनेल आणि 20 ब्रिजेस स्विम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला