Headlines

छत्रपती संभाजीनगर हादरले!:25 वर्षे इंग्रजी शिकवणाऱ्या ‘फिनिक्स’च्या सरांचा उपचारादरम्यान मृत्यू; बिल्डरच्या दबावाचा कुटुंबीयांचा आरोप




शहरातील विद्यार्थ्यांना गेल्या 25 वर्षांपासून इंग्रजी विषयाचे शिक्षण देणारे आणि ‘फिनिक्स इंग्लिश अकॅडमी’चे संचालक मोहन शिवराम कोरडे (60) यांच्या मृत्यूने शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी फिनिक्स क्लासेसच्या परिसरात विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी मिनी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कोरडे यांच्या कुटुंबीयांनी काही व्यक्तींवर गंभीर आरोप करत पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. मोहन कोरडे हे एकनाथनगर, उस्मानपुरा परिसरातील रहिवासी होते. त्यांनी छत्रपती संभाजीनगरातील सिडको, औरंगपुरा, क्रांती चौक आणि उस्मानपुरा परिसरात ‘फिनिक्स’च्या माध्यमातून इंग्रजीचे वर्ग घेतले. गेल्या अडीच दशकांत त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थी घडले. इंग्रजी शिकवण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांची विशेष ओळख निर्माण झाली होती. क्लासची जागा खाली करण्यासाठी दबाव? कोरडे यांच्या पत्नी सुनीता कोरडे यांनी केलेल्या आरोपांनुसार, फिनिक्स क्लासेस सुरू असलेली जागा खाली करण्यासाठी संबंधित बिल्डरकडून काही दिवसांपासून दबाव टाकला जात होता. जागा खाली करण्यासाठी सातत्याने त्रास दिला जात असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या कथित त्रासाबाबत मोहन कोरडे यांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार अर्जही दिला होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तक्रार करूनही अपेक्षित पद्धतीने दखल घेतली जात नसल्याने कोरडे मानसिक तणावाखाली होते. जागेचा वाद, त्यातून निर्माण झालेला दबाव आणि संबंधित यंत्रणांकडून दखल घेतली जात नसल्याची भावना यामुळे ते अस्वस्थ असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. याच मानसिक तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे. फिनिक्स क्लासेसमध्येच घेतले विषारी द्रव्य मंगळवारी दुपारी तापडिया टॉकीज कॅम्पसमधील फिनिक्स क्लासेसच्या ठिकाणी कोरडे यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे समोर आले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना तातडीने मिनी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाही त्यांची प्रकृती सुधारली नाही. अखेर बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सुसाइड नोटमध्ये कोणाची नावे? कोरडे यांनी मृत्यूपूर्वी कथितरीत्या एक सुसाइड नोट लिहिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. या नोटमध्ये काही विशिष्ट व्यक्तींचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासात सुसाइड नोट महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे. नोटमध्ये नेमके काय नमूद आहे आणि त्यात कोणाची नावे आहेत, याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. कारवाई होईपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका मोहन कोरडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुनीता कोरडे आणि नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. कुटुंबीयांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 25 वर्षांच्या अध्यापनाचा प्रवास अचानक थांबला मोहन कोरडे यांनी तब्बल 25 वर्षे इंग्रजी अध्यापनाचे काम केले. त्यांच्या फिनिक्स क्लासेसमधून अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजीचे धडे घेतले. त्यामुळे शहरातील शिक्षण क्षेत्रात त्यांची शिक्षक म्हणून स्वतंत्र ओळख होती. अचानक झालेल्या त्यांच्या मृत्यूने विद्यार्थ्यांमध्ये, माजी विद्यार्थ्यांमध्ये आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कोरडे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण, जागेच्या वादाची पार्श्वभूमी, कथित दबाव आणि सुसाइड नोटमध्ये नमूद करण्यात आलेल्या व्यक्तींची भूमिका या सर्व बाबींचा तपास सिडको एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे. पोलिस तपासानंतरच या प्रकरणातील आरोपांची सत्यता आणि मोहन कोरडे यांच्या टोकाच्या निर्णयामागील नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत. हेही वाचा… ‘नवनाथ बन यांचे आरोप पूर्णपणे खोटे’:कोरेगाव पार्क प्रकरणातील तरुणीची भूमिका, म्हणाली- ‘शिवराज मोरे यांनी मला मदत केली’ एमपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये घडलेल्या कथित राड्याच्या प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवराज मोरे यांच्यावर गंभीर आरोप करत कथित घटनेचा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर युवक काँग्रेसचे नेते शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळून लावले. मात्र, या संपूर्ण प्रकरणात आता संबंधित तरुणीने स्वतः पुढे येत नवनाथ बन यांचे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचा दावा केला आहे. ‘मला त्रास आणि धमकावले जात असल्याने मी शिवराज मोरे यांची मदत घेतली. ते माझ्या मदतीसाठी आले,’ असे तरुणीने सांगितले. राजकीय हेतूने आपले कॅरेक्टर असॅसिनेशन केले जात असल्याचा आरोपही तिने केला आहे. त्यामुळे कोरेगाव पार्क प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *