![]()
हिंगोली शहरातील कपडागल्ली परिसरात फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना शासनाकडून तातडीची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी मदतीचे आश्वासन दिल्याची माहिती पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी बुधवारी (7 ऑक्टोबर) दिली. कपडागल्ली परिसरातील आगीच्या घटनेनंतर पालकमंत्री नरहरी झिरवळ आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार रामराव वडकुते, आमदार राजेश नवघरे, माजी आमदार गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. झिरवळ यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत घटनेची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन आगीत जखमी झालेल्या नागरिकांची विचारपूस केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री झिरवळ म्हणाले, “ही घटना घडू नये होती; मात्र आता घटना घडल्यानंतर कोणाचा दोष आहे, कोण जबाबदार आहे, यापेक्षा दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना तातडीने मदत कशी मिळेल, हे महत्त्वाचे आहे.” या दुर्घटनेचा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटनेची माहिती दिली आहे. अपघातग्रस्तांना मदत मिळणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले असून, त्यांनी मदतीचे आश्वासन दिल्याचे झिरवळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या घटनेची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. आगीच्या कारणांचा तसेच फटाक्यांचा साठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमांचे पालन झाले होते की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. फटाके विक्रेत्यांनी नियमांचे पालन करणे आवश्यक केवळ हिंगोलीतच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील फटाके विक्रेत्यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. फटाक्यांचा साठा करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेऊनच साठा करावा, असे आवाहनही पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केले. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना फटाक्यांचा साठा करण्यात आल्याचे प्राथमिकदृष्ट्या आढळून आले आहे. या प्रकरणात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा…. ‘नवनाथ बन यांचे आरोप पूर्णपणे खोटे’:कोरेगाव पार्क प्रकरणातील तरुणीची भूमिका, म्हणाली- ‘शिवराज मोरे यांनी मला मदत केली’ एमपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये घडलेल्या कथित राड्याच्या प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवराज मोरे यांच्यावर गंभीर आरोप करत कथित घटनेचा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर युवक काँग्रेसचे नेते शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळून लावले. मात्र, या संपूर्ण प्रकरणात आता संबंधित तरुणीने स्वतः पुढे येत नवनाथ बन यांचे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचा दावा केला आहे. ‘मला त्रास आणि धमकावले जात असल्याने मी शिवराज मोरे यांची मदत घेतली. ते माझ्या मदतीसाठी आले,’ असे तरुणीने सांगितले. राजकीय हेतूने आपले कॅरेक्टर असॅसिनेशन केले जात असल्याचा आरोपही तिने केला आहे. सविस्तर वाचा…
Source link
हिंगोलीतील फटाक्यांच्या गोदामातील आगप्रकरणी अपघातग्रस्तांना शासनाची मदत:मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन, पालकमंत्री झिरवळांनी घटनास्थळी पाहणी करत जखमींची घेतली भेट