![]()
महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असतानाच ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा तीव्र झाला आहे. बुधवारी विदर्भातील अमरावती (३९ अंश सेल्सियस) हे राज्यातील सर्वाधिक तापलेले शहर ठरले. हे तापमान सरासरीपेक्षा ६.४ अंशाने जास्त आहे.
.
दरम्यान, २५ ऑक्टोबरनंतर तापमान घटून हळूहळू थंडीची चाहूल लागणार आहे. कमाल तापमानात अमरावतीच्या खालोखाल यवतमाळमध्ये ३८.२ अंश तर अकोल्यात ३७.९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. बुधवारी छत्रपती संभाजीनगर शहराचे कमाल तापमान ३६.५ तर किमान तापमान २१.२ अंश होते.
दुसरीकडे जळगाव येथे राज्यातील रात्रीचे तापमान सर्वात कमी म्हणजेच १७.२ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली असून ते सरासरीपेक्षा ४.१ अंश सेल्सियसने कमी आहे. जळगावात दुपारी ३७.६ अंशामुळे उकाडा, तर रात्री १७.२ अंश सेल्सियसमुळे गुलाबी गारवा असा निसर्गाचा अनोखा खेळ पाहायला मिळत आहे.
सूर्यकिरण सरळ दिशेने
हा ऑक्टोबर हीटचा परिणाम आहे. २१ सप्टेंबरला सूर्य विषुववृत्तावर होता त्या वेळी दिवस -रात्र सारखीच असते. त्या वेळी सूर्याची किरणेही सरळ दिशेने पडतात. ही स्थिती जवळपास २५ ऑक्टोबरपर्यंत असते. त्यानंतर तापमानात घट होण्यास सुरुवात होते व हळूहळू थंडीला सुरुवात होते. – डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ