![]()
सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी (दि. ६) धडक कारवाई करत बनावट देशी व विदेशी मद्याचा साठा जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ६ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा मारून १ लाख ७५ हजार ९१० रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा आणि साहित्य जप्त केले. या प्रकरणी तीन आरोपींना घटनास्थळावरून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाटनांद्रा येथील एका ठिकाणी बनावट दारूचा साठा करून तो विक्रीसाठी पाठवला जात होता. उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात ‘भिंगरी संत्रा’ नावाच्या देशी दारूच्या १८० मि.ली.च्या १,८७२ बाटल्या आणि ‘रॉयल स्टॅग’ या विदेशी ब्रँडच्या ९६ बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय बनावट विदेशी मद्य तयार करण्यासाठी लागणारे अंदाजे २० लिटर ब्लेंड आणि आय.बी. ब्रँडचे २०० जिवंत बुचे असा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी सुमित जैस्वाल (रा. घाटनांद्रा), शुभम जैस्वाल (रा. दहेगाव) आणि सुनील वाघ (रा. भवन) या तिघांविरुद्ध १९४९ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, प्रभारी विभागीय उपआयुक्त तथा अधीक्षक अभिनव बालुरे आणि उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक नागनाथ नागरगोजे, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, व्ही. एन. रानमाळकर, जवान के. जी. मोटे, टी. ए. जारवाल, एम. एस. मुजमुले, डी. एस. साळुंके, एस. पी. बागडे आणि चालक ए. एस. अन्नदाते यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक व्ही. एन. रानमाळकर करत आहेत.
Source link
घाटनांद्रा येथून बनावट देशी-विदेशी दारूचा 1.75 लाखांचा मुद्देमाल जप्त:राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची कारवाई, तिघांना केली अटक