Headlines

कागदोपत्री प्रक्रियेत अडकवू नका,‎दिवाळीपूर्वी सरसकट भरपाई द्यावी‎:बागलाणमध्ये दुष्काळी प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धरले धारेवर‎




सटाणा दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना पंचनामे आणि कागदोपत्री प्रक्रियेत अडकवू नका, दिवाळीपूर्वी सरसकट नुकसानभरपाई द्या, अशी मागणी बागलाणमधील दुष्काळ आढावा बैठकीत करण्यात आली. फार्मर आयडीवर शासनाकडे शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध असताना नव्याने सातबारा, पीक पाहणी आणि केवायसीची मागणी का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यासह चारा टंचाई, फळबागांचे नुकसान, रस्ता, कालवा आणि पाणी योजनांच्या प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. बागलाण पंचायत समितीत खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी दुष्काळ आढावा बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत कृषी अनुदान, जलजीवन पाणीपुरवठा योजना, तळवाडे-भामेर कालवा, सटाणा शहरातील रस्ता, वाहतूक कोंडी, वीज वितरण कंपनी तसेच दुष्काळी पंचनामे करताना कागदोपत्री प्रक्रियेसाठी होत असलेल्या दमछाकीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. दुष्काळामुळे चाराटंचाई निर्माण होणार असल्याने शेतकऱ्यांना मुरघास करण्याचे प्रशिक्षण द्यावे तसेच पशुखाद्यावर शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी केली. शासनाकडे शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीवरून सर्व माहिती उपलब्ध असताना दुष्काळ पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून नवीन सातबारा, पीक पाहणी आणि केवायसीची मागणी का केली जाते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पंचनामे आणि इतर प्रक्रियेत वेळ न घालवता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. तहसीलदार कैलास चावडे यांनी उत्तरे दिली. सटाणा शहरात दिवसभर उडणाऱ्या धुळीमुळे व्यावसायिकांना श्वसनाचे विकार झाले असून, तीन दिवसांत रस्ता कामाबाबत निर्णय घ्यावा अन्यथा रस्ताच बंद करण्याचा इशारा अरविंद सोनवणे यांनी दिला. रस्ता कामाबाबत माजी आमदार संजय चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. रस्त्याबाबतची तांत्रिक बाब सुटेपर्यंत तातडीने डांबरीकरण करावे अन्यथा ‘सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असताना मला आंदोलन करावे लागेल’, असा इशारा भाजपचे डॉ. विलास बच्छाव यांनी दिला. बैठकीत पिंपळदरसह तालुक्यातील पाणी योजना आणि तळवाडे-भामेर कालव्याच्या कामाबाबत संजय पवार व भाऊसाहेब आहिरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. डांगसौदाणे येथील पूल दोन वर्षांपासून बंद असल्याचा मुद्दा कैलास बोरसे यांनी उपस्थित केला. बैठकीस नगराध्यक्षा हर्षदा पाटील, माजी आमदार संजय चव्हाण, माजी सभापती यशवंत पाटील, किशोर कदम, प्रल्हाद पाटील आदींसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत व्यासपीठावर उपस्थित खासदार डॉ. शोभा बच्छाव; सोबत अधिकारी, पदाधिकारी व नागरिक. तळवाडे-भामेर कालव्याच्या प्रश्नावर दरवेळी उपोषण होते आणि अधिकारी निवेदन देऊन आंदोलन मोडीत काढतात; मात्र प्रत्यक्षात कालव्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम होत नसल्याचा आरोप भाऊसाहेब आहिरे यांनी केला. दोन वेळा निधी उपलब्ध होऊनही पाटाचे मेंटेनन्स झाले नसल्याचे सांगत, ‘याचे पाप अधिकाऱ्यांच्या माथी आहे’ असा आरोप त्यांनी केला. कालवा देखभालीसाठी मेंटेनन्सकडे वर्ग का केला जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *