![]()
मध्यरात्री विनाकारण फिरून गोंधळ घालणाऱ्या तरुण-तरुणींना घरी जा असे सांगणे एका पोलिस अंमलदाराच्या जिवावर बेतले. सोबतच्या तरुणांनी पोलिसाला पकडून ठेवत ‘याला जिवंत सोडू नको’ अशी चिथावणी दिली. त्यानंतर एका तरुणीने पोलिसावर चाकूहल्ला केला. करोडी परिसरातील आंबेडकर चौकात बुधवारी मध्यरात्री १.१० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी दौलताबाद पोलिसांनी ३ महिलांसह ८ जणांवर गुन्हा दाखल केला, तर घटनास्थळावरून एकाला अटक केली. फकिरा नब्बास तडवी ( ३७, ) असे जखमी पोलिस अंमलदाराचे नाव आहे. तर सागर संजय इंगळे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी शाहरुख ऊर्फ जावेद, रोहिणी सुभाष बेळगे, अश्विनी सुभाष बेळगे, सागर संजय इंगळे, अभी गायकवाड, रोहित चव्हाण (सर्व रा. कमळापूर, रांजणगाव) आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फकिरा तडवी हे दौलताबाद पोलिस ठाण्यात कार्यरत असून, ७ ऑक्टोबरच्या रात्री ते पोलिस अंमलदार गाडे आणि होमगार्ड नईम यांच्यासोबत डायल ११२ च्या वाहनावर रात्रपाळी गस्तीवर होते. मध्यरात्री १२.२२ वाजेच्या सुमारास भांगसीमाता गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोकळ्या पटांगणात तीन महिला व पाच पुरुष बसलेले आढळले. पोलिसांनी त्यांना रात्रीच्या वेळी येथे थांबण्याचे कारण विचारले व सुरक्षेच्या कारणास्तव तेथून जाण्यास सांगितले. चोर असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस घटनास्थळी रात्री १.१० वाजेच्या सुमारास करोडी गावात जाणाऱ्या रस्त्यावरील आंबेडकर चौकात चोर आल्याची माहिती एका प्रवाशाने गस्ती पथकाला दिली. तडवी आणि त्यांचे सहकारी तेथे पोहोचले असता, आधी हटकलेले तेच आठ जण तेथे आपापसात गोंधळ घालत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना पुन्हा हटकून त्यांची नावे विचारली आणि तेथून जाण्यास सांगितले. या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
Source link
याला जिवंत सोडू नको म्हणत पोलिसावर चाकूहल्ला:करोडी परिसरातील आंबेडकर चौकात मध्यरात्रीची घटना, हटकल्याच्या रागातून तरुणीचे कृत्य