Headlines

पुण्यात अपघातांचे सत्र सुरूच:खराडीत मुंढवा उड्डाणपुलाजवळ अन् मंगळवार पेठेत वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू; दोन्ही चालक फरार




पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. खराडी आणि मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक परिसरात अपघाताच्या घटना घडल्या. खराडी भागातील मुंढवा उड्डाणपुलाजवळ वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी एका वाहन चालकाविरुद्ध खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुरेंद्र नामदेव गायकवाड (वय 42, रा. मते नगर, वडगाव शेरी) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई हनुमंत कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हे खराडी भागातील मुंढवा उड्डाणपुूल परिसरातून निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलिस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत. मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 35 वर्षीय तरुणाची ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांनी दिली. याबाबत पोलिस कर्मचारी बाळासाहेब भांगरे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकातून निघाला होता. त्या वेळी रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला पोलिसांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक एन मदने तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *