शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक नांदणी मठातील श्रद्धा आणि कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा विषय ठरलेल्या ‘माधुरी’ हत्तिणीच्या प्रकरणात आज कोल्हापूरकरांच्या एकजुटीचा आणि जनलढ्याचा ऐतिहासिक विजय झाला. प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या ‘पेटा’ (PETA India) या आ
.
सगळे लोक आनंदी असताना तुम्हाला काय त्रास?; सर्वोच्च न्यायालयाने पेटाची केली कानउघाडणी
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली असता, न्यायालयाने पेटाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने पेटाच्या वकिलांना थेट सवाल केला की, “स्थानिक जनता, मठाचे भाविक आणि संपूर्ण परिसर आनंदी आहे; हत्तिणीची तिथे योग्य ती काळजी घेतली जात असताना नेमकी तुम्हालाच काय अडचण आहे?”
25 हजारांचा दंड
वारंवार याच मुद्यावरून न्यायालयात धाव घेऊन जनभावनेच्या विरोधात अनावश्यक कायदेशीर पेच निर्माण केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने पेटाची याचिका फेटाळली आणि संस्थेला 25 हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले.
पेटाचा न्यायालयात नेमका आक्षेप काय होता?
नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठातील माधुरी हत्तिणीला पुन्हा जामनगरच्या रिलायन्स फाऊंडेशन संचालित ‘वनतारा’ प्रकल्पात हलवावे, अशी मागणी पेटाने याचिकेत केली होती. पेटाने असा युक्तिवाद केला होता की, माधुरीला वनतारातून पुन्हा नांदणी मठात पाठवण्याचा प्रशासनाचा निर्णय हा मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे थेट उल्लंघन आहे.
फटाक्यांचा त्रास आणि एकाकीपण
मठात परत आल्यानंतर हत्तिणीच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, कर्णकर्कश ढोल-ताशांचा गजर झाला. त्यामुळे ती तणावात आली असून तिला पुन्हा शेडमध्ये साखळदंडाने बांधून एकाकी ठेवले गेले आहे, असा आरोप पेटाने केला.
आरोग्याची कारणे
गेल्या 33 वर्षांपासून मठात राहिल्याने माधुरीच्या पायांना आणि गुडघ्यांना सूज आली आहे, डांबरी रस्त्यावर चालणे तिच्यासाठी असह्य झाले आहे; त्यामुळे तिला आधुनिक वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी वनतारामध्येच ठेवणे तिच्या हिताचे असल्याचा दावा पेटाकडून करण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद पूर्णपणे अमान्य केला.
कोल्हापूर भडकले होते; रस्त्यावरील लढ्याला मिळाले कायदेशीर अधिष्ठान
काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने कोल्हापूरकरांना विश्वासात न घेता माधुरी हत्तिणीला गुपचूप गुजरातमधील जामनगर येथील ‘वनतारा’ प्रकल्पात हलवले होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच अवघा कोल्हापूर जिल्हा पेटून उठला होता. महायुती, महाविकास आघाडी, विविध शेतकरी संघटना, जैन धर्मियांसह सकल कोल्हापूरकरांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलने केली होती. महामार्ग रोखण्यात आले होते आणि बंदची हाक देण्यात आली होती.
माधुरी मठात परतली
जनक्षोभाची तीव्रता आणि जनभावनेचा रेटा पाहून प्रशासनाला नमते घ्यावे लागले होते. हत्तिणीला सुखरूप परत आणण्याचे आश्वासन देण्यात आले आणि काही दिवसांतच माधुरीचे नांदणी मठात पुनरागमन झाले होते. मात्र, पेटाने सर्वोच्च न्यायालयात खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. आज न्यायालयाच्या या अंतिम निर्णयाने कोल्हापूरकरांच्या त्या रस्त्यावरील लढ्यावर कायदेशीर शिक्कामोर्तब झाले आहे.
नांदणी मठात साखर वाटून जल्लोष
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होताच नांदणी, शिरोळ, जयसिंगपूर आणि कोल्हापूर शहरात मठाच्या भाविकांनी फटाके फोडून आणि पेढे-साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. “माधुरी ही केवळ एक हत्तीण नसून मठाचा आणि कोल्हापूरच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. तिच्या आरोग्याची, आहाराची आणि निवासाची मठात उत्तम काळजी घेतली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने पेटाचा खोटा कांगावा हाणून पाडून जनतेच्या श्रद्धेचा सन्मान केला आहे,” अशी भावना मठाच्या विश्वस्तांनी आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
———————————————————————-
हेही वाचा…
आणखी 36 तालुके दुष्काळी यादीत समाविष्ट होणार: केंद्राच्या 3 टीम महाराष्ट्रात दाखल; बावनकुळे म्हणाले- राहुल गांधींनी आधी कपिल सिब्बल यांच्याकडून शिकून घ्यावे!

“राज्यातील 265 दुष्काळी तालुक्यांव्यतिरिक्त आणखी 36 तालुक्यांच्या समावेशासाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचलली आहेत. यापैकी 18 तालुक्यांचे 20 टक्के प्रत्यक्ष सर्वेक्षण (ग्राउंड ट्रुथिंग) करून दुष्काळी सवलती लागू करण्याचा अधिकृत शासन निर्णय (जीआर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने जारी करण्यात आला आहे; तर उर्वरित 18 तालुक्यांचा प्राथमिक अहवाल मागवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः गांभीर्याने दखल घेतली असून केंद्राची तीन विशेष पाहणी पथके विदर्भ-मराठवाड्यात प्रत्यक्ष दाखल झाली आहेत,” अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी