![]()
विवाहितेचे फोटो वापरून समाज माध्यमावर बनावट अकाउंट तयार करत अत्यंत अश्लील व आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून बदनामी केली. एवढेच नाही तर पीडितेच्या पतीसह नातेवाइकांनाही विकृत मेसेज पाठवून मानसिक छळ केला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंदवला असून सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे. गादिया विहार परिसरातील ३० वर्षांच्या विवाहितेच्या पतीला ४ ऑक्टोबर रोजी एका अज्ञात अकाउंटवरून मेसेज व फॉलो रिक्वेस्ट आली होती. पतीने प्रोफाइल तपासले असता त्यावर पत्नीचे फोटो वापरून तयार केलेल्या रील्स आणि स्टोरीवर विकृत मजकूर दिसून आला. विवाहितेने ते खाते आपले नसल्याचे स्पष्ट केले. पतीने संबंधित फेक अकाउंटवर मेसेज करून विचारणा केली असता, अज्ञात आरोपीने शिवीगाळ व धमकी दिली. त्यानंतर आरोपीने विवाहितेचा भाऊ व इतर जवळच्या नातेवाइकांनाही फॉलो रिक्वेस्ट पाठवून बदनामीकारक मजकूर पसरवला. ७ ऑक्टोबर रोजी आरोपीने या बनावट अकाउंटचे युजरनेम बदलले. पुढील तपास निरीक्षक सचिन कुंभार करत आहेत. दिव्य मराठी इनसाइड स्टोरी: …अन् पुरावे मिटवण्यासाठी बदलले युजरनेम पीडित महिलेच्या पतीने फेक अकाउंटवर मेसेज करून जाब विचारल्यानंतर आरोपी सतर्क झाला. पोलिसांत तक्रार होईल किंवा आपले अकाउंट ब्लॉक केले जाईल, या भीतीपोटी आरोपीने ७ ऑक्टोबर रोजी या इन्स्टाग्राम अकाउंटचे युजरनेम बदलून टाकले. ओळख लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने ही युक्ती वापरली. युजरनेम बदलले तरी डिजिटल फूटप्रिंट्स (आयपी ॲड्रेस व युनिक आयडी) नष्ट होत नसल्याने, आरोपी सापडू शकेल.
Source link
सोशल मीडियात विवाहितेचे बनावट अकाउंट तयार करून अश्लील पोस्ट:पती अन् भावालाही मेसेज; जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल