Headlines

इंद्रगढी देवी संस्थानची नवरात्रोत्सव तयारी पूर्ण:रविवारी घटस्थापना; विविध कार्यक्रमांचे आयोजन‎




येथून जवळच डोंगराच्या रम्य कुशीत वसलेल्या आणि माहूरच्या श्री रेणुका मातेचे प्रमुख उपपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगदंबा श्री इंद्रगढी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची संस्थानात जय्यत तयारी झाली आहे. आगामी नवरात्रोत्सवासाठी संस्थान पूर्णपणे सज्ज झाले असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष रघुनाथ मोरे आणि उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांनी दिली असून, २० हजार भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या वर्षीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आश्विन शुद्ध प्रतिपदा, रविवारपासून प्रारंभ होणार आहे, या सोहळ्याची सांगता मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दसरा आणि सीमोल्लंघनाने होणार आहे. ब्रह्मलीन जबलपूरकर स्वामी यांच्या पावन आशीर्वादाने सुरू होणाऱ्या या नवरात्रोत्सवासाठी इंद्रगढी देवी संस्थानतर्फे सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उत्सव काळात मंदिर परिसरात स्वच्छता, डागडुजी आणि संपूर्ण मंदिरावर अत्यंत आकर्षक अशी नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सलग दहा दिवस चालणाऱ्या या धार्मिक महोत्सवात दैनंदिन विधींसह अनेक विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी देवीची पंचामृताने स्नानविधी, महापूजा, भावपूर्ण अभिषेक आणि शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना पार पडणार आहे. नवरात्रभरात दररोज श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ, देवीची अलंकार पूजा, अष्टमीचा होम-हवन आणि विजयादशमीच्या दिवशी शमीपूजन यांसारखे विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या पवित्र पर्व काळात परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे संयुक्त आवाहन इंद्रगढी देवी संस्थानचे अध्यक्ष रघुनाथ मोरे, उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, सुरेशअप्पा गुळवे, समाधान पा. सोनवणे, रामजी मोरे, रामराव सुलताने, दगडूलाल भैरवलाल खत्ती, त्र्यंबक सोनवणे, नंदकिशोर शर्मा, नामदेव पवार, पांडुरंग मोरे, रत्नाकर भरकर, भिकन मोरे आणि लक्ष्मण जाधव आदींनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *