![]()
राज्य शासनाने मोठ्या घोषणाबाजीत जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाला दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला आहे. मात्र, इतका वेळ उलटूनही या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप कागदावरच अडकल्याने बळीराजा पूर्णपणे निराश झाला आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि लालफितीच्या कारभारामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जबाजारीपणाच्या चक्रात ढकलला जात असून, शेतकरी वर्गातून शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासनाने काही महिन्यांपूर्वी संकटग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी ही कर्जमाफी जाहीर केली होती. या घोषणेमुळे हवालदिल झालेला शेतकरी वर्ग आगामी शेती हंगामासाठी नव्याने कर्ज मिळवण्यास पात्र ठरेल आणि त्याला मोठा आधार मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु, बँकेच्या वारंवार फेऱ्या मारूनही प्रत्यक्षात कोणताही लाभ शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नाही. अनेक भागांत पात्र शेतकऱ्यांच्या अंतिम याद्याच अजून जाहीर झालेल्या नाहीत, तर ज्या भागांत याद्या आल्या आहेत तिथे बँकांकडून वेगवेगळ्या तांत्रिक कारणांचा दाखला देत शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले जात आहे. सध्या शेतीकामांची मशागत, खते व बियाण्यांची खरेदी करण्यासाठी शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, तसेच एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांसारख्या सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांकडून नवीन कृषी कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पुन्हा खासगी सावकारांच्या दारात जावे लागत आहे. यंत्रणेतील समन्वयाच्या अभावामुळे आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मूळ पात्र घटकांपर्यंत पोहोचत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. अद्याप खात्यावर रुपयाही जमा नाही ः शेतकरी शेतकरी आप्पा लक्ष्मण फुके म्हणाले की, शासनाने केवळ निवडणुकीच्या किंवा प्रसिद्धीच्या डोळ्यांनी या घोषणा केल्या का? दोन महिने झाले तरी आमच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही किंवा कर्जमुक्तीचा कोणता दाखला मिळालेला नाही. शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. यंदा पाऊस नसल्याने खरीप हंगाम हातातून गेला आहे. तर रब्बीची पेरणी करणेही कठीण आहे. त्यामुळे शासनाने तातडीने शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याच्या सूचना बँकांना कराव्यात अशी मागणी टाकळी जिवरग परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.
Source link
कर्जमाफीची घोषणा; बँकांकडून कर्ज मिळेना:शासनाकडून घोषणा होऊन दोन महिने उलटले, अंमलबजावणी कागदावरच