![]()
न्याय द्या, न्याय द्या, सरकार आम्हाला न्याय द्या अशा घोषणा देत भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी पैठण तहसील कार्यालयावर धडक भाकर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गायरान जमिनींवरील हक्क मान्य करून अतिक्रमणधारकांना तात्काळ न्याय द्यावा, अशी प्रमुख मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. या आंदोलनाची सुरुवात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत हा मोर्चा बसस्थानक व पंचायत समितीमार्गे तहसील कार्यालयावर धडकला. संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष मनेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मोर्चात शेकडो गायरानधारक नागरिक सहभागी झाले होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वनपट्टेधारकांच्या जमिनी त्यांच्या नावे करण्याबाबत केलेल्या घोषणेचा संदर्भ देत, स्थानिक प्रशासनाने अतिक्रमणांच्या नोंदी व अहवाल तात्काळ शासनाकडे पाठवावेत, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली. या संदर्भात तहसीलदार ज्योती पवार यांच्याकडे विचारणा केली असता, महसूल विभागाकडून याबाबत अद्याप कोणतेही लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी आंदोलकांनी गायरानधारकांची नावे, गावे आणि गट क्रमांकांची सविस्तर माहिती तहसील कार्यालयात सादर केली. या मोर्चात संस्थापक अध्यक्ष प्रशांत मुनवर, पंडित नवगिरे, तालुकाध्यक्ष तुकाराम गायकवाड, महिला अध्यक्ष मिराबाई जाधव, शेख पाशुभाई, अनिल अहिरे आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Source link
गायरान जमिनींवरील हक्क मान्य करून अतिक्रमणधारकांना तात्काळ न्याय द्यावा:पैठण तहसील कार्यालयावर गायरानधारकांचा भाकर आक्रोश मोर्चा