Headlines

आढावा बैठक:पाणीटंचाईकडे दुर्लक्ष नको; रोहयोची कामे तातडीने सुरू करा: आमदार भुमरे




तालुक्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, नागरिकांना वेळेत पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या; तसेच रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करून दुष्काळाच्या काळात मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्या, असे स्पष्ट निर्देश आमदार विलास भुमरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. पैठण येथील पंचायत समितीच्या सभागृहात आमदार विलास भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीस पंचायत समितीच्या सभापती वैशाली विनोद बोंबले, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, अप्पासाहेब निर्मळ, नंदू पठाडे, कार्यकारी अभियंता गणेश हासे, कृषी अधिकारी विकास पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश कांबळे, राजेंद्र वाघमोडे, मनोज गायके, अनिकेत धायकर, सतीश अंधाळे, दादा गलांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत तालुक्यातील पाणीटंचाईची आढावा घेताना आमदार विलास भुमरे यांनी जायकवाडी धरणातील सद्यस्थितीतील पाणीसाठा, हिरडपुरी व आपेगाव बंधाऱ्यांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर सविस्तर चर्चा केली. पुढील काळात पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आत्तापासूनच सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. लोहगाव व परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ब्रह्मगव्हाण येथील पंप त्वरित सुरू करण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच मुधलवाडी, एमआयडीसी आणि खोडेगाव येथील पाणी भरण्याच्या मुख्य पॉइंटवर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यास सांगण्यात आले. अनधिकृतरीत्या पाणी घेत असल्याचे आढळल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश त्यांनी दिले. रोजगार हमी योजनेची कामे थांबवू नका दुष्काळाच्या कठीण प्रसंगी ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला रोजची मजुरी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्या ज्या गावांमधून रोजगाराची मागणी होईल, तेथे कोणत्याही परिस्थितीत विलंब न करता तातडीने कामे सुरू करा. नाला खोलीकरण, गाळ काढणे, ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ यांसारख्या जलसंधारणाच्या कामांना प्रथम प्राधान्य द्या. कोणत्याही तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणास्तव रोजगार हमीची कामे थांबणार नाहीत, याची पूर्ण दक्षता घेण्याच्या सूचना आमदार भुमरे यांनी केल्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील २४ सिंचन तलावांमधील गाळ काढणे आणि नाला खोलीकरणाची कामे करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती या बैठकीत अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *