Headlines

कॉक्रोच जनता पार्टीचे मुंबईत आंदोलन:शिवाजी पार्कला छावणीचे स्वरूप, आंदोलनापूर्वीच पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड




कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीनंतर आता मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीत आंदोलन करण्यापूर्वी पोलिसांनी हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. तसेच, पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर आता पक्षाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, पोलिसांकडून सीजेपीच्या कार्यकर्त्यांना आणि आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. कॉक्रोच जनता पार्टीकडून आज दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनापूर्वीच परिसराला छावणीचे स्वरूप आले असून, ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलन सुरू होण्याआधीच पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई केली जात आहे. तसेच, काही कार्यकर्त्यांची धरपकडही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. अजिंक्य शिंदे काय म्हणाले? दरम्यान, सीजेपीचे अजिंक्य शिंदे यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा देशाला हुकूमशाहीकडे नेत आहेत. याबद्दल प्रत्येक भारतीयामध्ये संताप आहे. काल दिल्ली आणि देशभरात ज्या प्रकारे हजारो लोकांना ताब्यात घेण्यात आले. त्या कृतीला नक्कीच आव्हान दिले जाईल. या हुकूमशाहीविरुद्ध देशभर निदर्शने सुरू झाली आहेत. मुंबईत आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथील ‘टी जंक्शन’ येथे आंदोलक शांततापूर्णरीत्या एकत्र जमतील. लवकरच इतर शहरांमध्येही अशी आंदोलने होतील. आमच्या नेत्यांना अटक करून आणि लोकशाहीची गळचेपी करून सरकारने मोठी चूक केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, असे ट्विट अजिंक्य शिंदे यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *