![]()
सौर ऊर्जेबाबत जनजागृती करण्यासह या क्षेत्रातील उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी गोपाल काबरा फाउंडेशन आणि जीके एनर्जी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सौर संवाद २०२६’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १२ ते १८ ऑक्टोबर २०२६ यादरम्यान होणाऱ्या या यात्रेचा शुभारंभ सोमवारी (दि. १२) सकाळी ९.३० वाजता अहिल्यानगर येथून होणार आहे. महाराष्ट्रातील १४ शहरांमध्ये ही यात्रा पोहोचणार असून, त्यामध्ये अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिक, धुळे, बुलढाणा, अमरावती, भांडारा, चंद्रपूर, वाशीम, नांदेड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात जनजागृती करणार आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील इच्छुक उद्योजकांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सौर ऊर्जेचा वापर केवळ वीज निर्मितीपुरता मर्यादित न ठेवता त्यातून स्थानिक व्यवसाय, रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः युवक आणि महिलांना सौर ऊर्जा क्षेत्रातील व्यवसायाच्या संधींची माहिती देऊन त्यांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. एक हजारांहून अधिक इच्छुक उद्योजकांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमाने ठेवले आहे. केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहनपर अनेक योजना हाती घेतल्या आहेत. त्यालाही या यात्रेमुळे चालना मिळणार आहे, असे जीके एनर्जी लिमिटेडचेअरमन व व्यवस्थापकीय संचालक गोपाल काबरा यांनी सांगितले. घरगुती छतावरील (रुफटॉफ) सौर यंत्रणा, व्यावसायिक सौर प्रकल्प, सौर कृषिपंप, ऊर्जा साठवण, यंत्रणा बसविणे, देखभाल आणि वितरण अशा विविध क्षेत्रांतील संधींची माहिती यात्रेदरम्यान दिली जाणार आहे. तसेच विक्री, सेवा आणि तांत्रिक कामांसाठी स्थानिक पातळीवर व्यवसाय कसा सुरू करता येईल, याबाबत व्यावहारिक मार्गदर्शन केले जाईल. सौर ऊर्जेच्या माध्यमातून जिल्हास्तरावर उद्योजकांचे जाळे निर्माण करून स्थानिक रोजगार वाढविणे आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा प्रसार वेगाने करणे, हा या यात्रेमागील व्यापक दृष्टिकोन आहे. या क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञान इच्छुक उद्योजकांपर्यंत पोहोचवून त्यांना शाश्वत व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यावरही भर दिला जाणार आहे, असे आयोजकांनी सांगितले आहे.
Source link
सौर ऊर्जेच्या प्रसारासाठी 'सौर संवाद 2026' यात्रेचे आयोजन:गोपाल काबरा फाउंडेशन व जीके एनर्जीचा संयुक्त उपक्रम; 14 जिल्ह्यात साधणार संवाद