Headlines

शारदीय नवरात्र:संभाजीनगरच्या रेणुकामाता मंदिरात भव्य सोहळा, दर्शनरांगा, भाविकांसाठी पाणी, आरोग्यसेवेचे नियोजन; 300 महिला स्वयंसेविका सांभाळणार दर्शनाची धुरा




ऐतिहासिक वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक वास्तू तर आहेतच; पण येथील प्राचीन मंदिरे आणि त्यांच्याशी जोडलेला इतिहासही भाविकांना आकर्षित करतो. शहरातील सिडको एन-9 परिसरात असलेले श्री रेणुका माता मंदिर हे त्यापैकीच एक. ‘प्रतिमाहूर’ म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सवात रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना, चांदीने मढवलेला आणि सोन्याचा मुलामा दिलेला गाभारा तसेच देवीचा तांदळा यांमुळे या मंदिराला वेगळी ओळख मिळाली आहे. या मंदिराची स्थापना 1984 मध्ये झाल्याचे सांगितले जाते. प. पू. अण्णा महाराज सोनईकर यांनी मंदिरातील देवीचा तांदळा स्वतः तयार करून त्याची स्थापना केली. अण्णा महाराजांना साक्षात्कार झाला आणि या ठिकाणी रेणुका मातेचे स्थान असल्याचे त्यांनी स्थानिकांना सांगितले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यानंतर स्थानिकांनी एकत्र येऊन येथे मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे स्थान बनले आहे.
सुरुवातीला एका चौथऱ्यावर पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या या मंदिराचे पुढे रूपांतर झाले. आज या मंदिराने संस्थानाचे स्वरूप प्राप्त केले आहे. येथील देवीचा तांदळा माहूर येथील रेणुका मातेच्या तांदळ्याशी साधर्म्य दर्शवतो. त्यामुळे या मंदिराला ‘प्रतिमाहूर’ म्हणून संबोधले जाते.

40 ते 45 फूट उंच मंदिराचे शिल्पवैभव मंदिराची उंची सुमारे 40 ते 45 फूट आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच उंच शिखर, बाह्य भिंतींवरील देखणी शिल्पे आणि नक्षीकाम लक्ष वेधून घेतात. या भिंतींवर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. मंदिरात भव्य सभामंडप असून, त्याच्या डाव्या बाजूला गर्भगृह आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना चवऱ्या ढाळणाऱ्या स्त्रीप्रतिमा आहेत. प्रवेशद्वाराजवळच सभामंडपात कासवमूर्ती पाहायला मिळते. सभामंडपातील एका भिंतीवर देवीच्या नऊ रूपांची माहिती देण्यात आली आहे. देवीच्या या नऊ रूपांमध्ये हिमालयाची कन्या शैलपुत्री, तपस्विनी स्वरूपातील ब्रह्मचारिणी, कपाळावर अर्धचंद्र धारण करणारी चंद्रघंटा, विश्वजननी कूष्मांडा, कार्तिकेयाची माता स्कंदमाता, ऋषी कात्यायनांची कन्या कात्यायनी, वाईट शक्तींचा नाश करणारी कालरात्री, गौरवर्णीय महागौरी आणि सर्व सिद्धींची स्वामिनी सिद्धिदात्री यांचा समावेश आहे. नवरात्रोत्सवात देवीच्या या नऊ रूपांच्या उपासनेला विशेष महत्त्व असते. 200 किलो चांदीने मढवलेला गाभारा मंदिराच्या गाभाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर करण्यात आलेले चांदीचे आवरण. 2011 मध्ये गाभाऱ्याला 200 किलो चांदीचे आवरण करण्यात आले होते. त्यावर नंतर सोन्याचा मुलामा देण्यात आला. गाभाऱ्यातील ही कलाकुसर आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी हे विशेष आकर्षण ठरते. नवरात्रात विशेष धार्मिक आणि सामाजिक उपक्रम मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, नवरात्रोत्सवात या कार्यक्रमांना विशेष महत्त्व असते. या काळात आरोग्य शिबिरे, नेत्रदान आणि रक्तदान शिबिरांसह कीर्तन, भारूड, महाप्रसाद आणि आरती असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवात दररोज सुमारे 20 ते 25 हजार भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीची ओटी भरण्यासाठी महिला भाविकांची पहाटेपासूनच रांग लागते. ओटी भरण्यासाठी मंदिरात स्वतंत्र सुविधा करण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने सुरक्षिततेचीही काळजी घेतली जाते. मंदिर परिसरात एकूण 32 सीसीटीव्ही कॅमेरे असून, उत्सवाच्या काळात त्यांची संख्या आणखी वाढवली जाते. विविध पूजा आणि धार्मिक विधींची सुविधा मंदिरात भाविकांना ऐच्छिक अभिषेक, पौर्णिमेचा अभिषेक, कुंकुमार्चन, सप्तशती पाठ, श्रीसूक्त अभिषेक, भोगीपूजा आणि शेंदूरलेपन असे विविध धार्मिक विधी करता येतात. याशिवाय, मंदिराच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्यासारखे सामाजिक उपक्रमही आयोजित केले जातात. धार्मिक श्रद्धा, मंदिराचे शिल्पवैभव आणि सामाजिक कार्य यांचा संगम असलेले हे रेणुका माता मंदिर नवरात्रोत्सवात भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरते. 300 महिला स्वयंसेवक, आरोग्य शिबिर अन् प्रसादाचे नियोजन सिडको एन-9 येथील प्रसिद्ध श्री रेणुका माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी आणि सुरक्षेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दररोज 25 ते 30 हजार भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता गृहीत धरून मंदिर संस्थानच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रेणुका माता मंदिर संस्थानाचे कार्याध्यक्ष सुभाष तगारे यांनी दिली. नवरात्रोत्सवाच्या नियोजनाबाबत बोलताना सुभाष तगारे म्हणाले, नवरात्रोत्सवासाठी मंदिराबाहेर भव्य सभामंडप आणि एक मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. उत्सवादरम्यान मंदिरात महिला भाविकांची मोठी गर्दी असते आणि त्यांना देवीची ओटी भरायची असते. महिला भाविकांची गर्दी होऊन कोणाचीही गैरसोय होऊ नये आणि सर्वांना लवकरात लवकर दर्शन घेता यावे, यासाठी ओटी भरण्यासाठी आणि दर्शनरांगेसाठी स्वतंत्र बॅरिकेटिंगची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 300 महिला स्वयंसेविका रात्रंदिवस तैनात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे यासाठी स्वयंसेवकांचे मोठे जाळे तयार करण्यात आले आहे. रोज येणाऱ्या 25 ते 30 हजार भाविकांच्या सोयीसाठी सेवाभावी वृत्तीने सुमारे 300 महिला स्वयंसेविका विविध टप्प्यांत कार्यरत असणार आहेत. दर्शनरांग, ओटी भरण्याचे ठिकाण, तसेच भैरवनाथ मंदिर परिसरात पालखी आणि जोगव्याच्या ठिकाणी या महिला स्वयंसेविका पूर्णवेळ उपस्थित राहून मदत करतील. 10 दिवस मोफत आरोग्य तपासणी मंदिर संस्थानच्या वतीने यंदा धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत. सामाजिक संकुलामध्ये दररोज दुपारी 12 वाजताच्या महाआरतीनंतर सर्व भाविकांसाठी साबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय, नवरात्रोत्सवाच्या संपूर्ण 10 दिवसांत भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *