Headlines

नेहमी सतर्क राहा अन् आर्थिक फसवणूक टाळा- ढिकले:नागरिकांना ऑनलाइन व्यवहारात सतर्क राहण्याचा सल्ला, सायबर सुरक्षा कार्यशाळेला प्रतिसाद‎




आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सोशल मीडियावरील प्रलोभने, बनावट जाहिराती आणि अनोळखी व्यक्तींकडून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमुळे नागरिकांची फसवणूक होत आहे. मात्र, अकारण भीती आणि मोह टाळून योग्य ती सतर्कता बाळगल्यास सायबर गुन्ह्यांना आळा घालता येऊ शकतो, असे प्रतिपादन सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते ॲड. युवराज शिंदे यांच्या सहकार्याने कल्याण रोड परिसरातील महालक्ष्मी लॉन्स येथे नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी उपस्थित नागरिकांना सायबर फसवणुकीचे विविध प्रकार, त्यापासून बचाव करण्याचे उपाय आणि फसवणूक झाल्यास करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ढिकले म्हणाले, सणासुदीच्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन खरेदी करतात. याच काळात सोशल मीडियावर आकर्षक ऑफर, बनावट जाहिराती आणि प्रलोभने दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात पाच हजार सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून या माध्यमातून नागरिकांची तब्बल ३६० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ही बाब गंभीर असून प्रत्येक नागरिकाने सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर करताना विशेष दक्षता घ्यावी. कोणत्याही संस्थेचा अधिकारी असल्याचे भासवून संपर्क साधणाऱ्या अनोळखी व्यक्तींना बँक खात्याची माहिती, एटीएम किंवा क्रेडिट कार्डची माहिती तसेच ओटीपी देऊ नये. अशा व्यक्तींच्या सांगण्यावरून कोणतेही ॲप डाउनलोड करू नये. अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंक उघडणे किंवा त्यांच्या सांगण्यावरून क्यूआर कोड स्कॅन करणे टाळावे असे त्यांनी सांगितले. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक, सावध राहा अलीकडच्या काळात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांना घाबरवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत. कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगून किंवा पोलीस व अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांवर दबाव आणला जातो. मात्र, ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली अशा प्रकारे नागरिकांना घरी किंवा ऑनलाइन माध्यमातून ताब्यात ठेवण्याची कायदेशीर प्रक्रिया अस्तित्वात नाही. त्यामुळे अशा फोन कॉल्सना घाबरून पैसे पाठवू नयेत किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन ढिकले यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *