Headlines

‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषाने श्रीदेवीचा माळ दुमदुमला!:श्री कमलाभवानी मंदिरात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ




करमाळा तालुक्यातील श्रीदेवीचा माळ येथील प्रसिद्ध श्री कमलाभवानी मंदिरात रविवारी (ता. ११) सकाळी नऊ वाजता विधिवत घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. ‘आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो’ या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनासाठी तसेच ज्योत नेण्यासाठी विविध गावांतील भाविक आणि तरुण मंडळांनी मंदिरात गर्दी केली होती. मंदिराचे विश्वस्त शिरीषकुमार लोणकर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते श्री कमलाभवानी मातेची विधिवत पूजा करण्यात आली. दादासाहेब पुजारी यांनी देवीची सर्वालंकारभूषित पूजा मांडली. देवीला चंदनाचा मळवट भरण्यात आला. चांदीचा मुकुट, त्रिशूळ व तलवार परिधान करून देवीची सुवर्णालंकारांनी सजविलेली आकर्षक पूजा मांडण्यात आली होती. यावेळी करमाळ्याच्या तहसीलदार तथा मंदिराच्या पदसिद्ध विश्वस्त सदस्य शिल्पा ठोकडे उपस्थित होत्या. पूजेनंतर आरती सोहळा पार पडला. घटस्थापना व आरती सोहळ्यावेळी बापूराव पुजारी, महेश कवादे, बाळासाहेब सोरटे, रामलिंग सोरटे, अभिमान सोरटे, रत्नदीप पुजारी, विजय पुजारी, तुकाराम सोरटे, पुरोहित सुशील पुराणिक, रविराज पुराणिक, मानकरी अभिषेक फुलारी, बबन दिवटे, ईश्वर पवार, विनायक पवार, पद्माकर सूर्यपुजारी, इताज शेख, हनुमंत पवार, प्रमोद गायकवाड, मनोज जामदार, शिवाजी पकाले, राजेंद्र शिंदे आणि विलास दबडे यांच्यासह अनेक मानकरी व भाविक उपस्थित होते. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा करण्यात आली. घटस्थापनेनंतर श्री भवानी मातेचा पंचायतन आरती सोहळा सुरू झाला. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत दररोज सकाळी नऊ वाजता आणि रात्री नऊ वाजता आरती सोहळा पार पडणार आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. ज्योत नेण्यासाठी मंडळांची गर्दी नवरात्रोत्सवानिमित्त माही डेकोरेशन आणि मराठा मंदिर डेकोरेशन यांच्या वतीने मंदिरात मोफत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी ज्योत नेण्यासाठी विविध गावांतील तरुण मंडळांचे ताफे वाजतगाजत मंदिरात दाखल झाले. तसेच, करमाळा पोलीस ठाण्याच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *