.

दुष्काळाच्या तीव्र झळा सहन करत आणि लाखो रुपयांची गुंतवणूक करून जगवलेल्या बेंबळे परिसरातील केळी बागांवर सध्या संकटाचे सावट आले आहे. काढणीला आलेल्या पिकाला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. व्यापारी अत्यंत कमी दराने खरेदी करत असल्याने उत्पादन खर्च वसूल करणेही कठीण झाले आहे. गतवर्षी निर्यातक्षम केळीला प्रतिकिलो २८ ते ३० रुपये, तर मध्यम प्रतीच्या केळीला १८ ते २० रुपये भाव मिळाल्याने समाधानकारक नफा मिळाला होता. मात्र, यंदा निर्यात पूर्णपणे बंद असल्याने निर्यातक्षम केळीचा भाव घसरून अवघा १२ ते १५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. तर मध्यम प्रतीच्या केळीला ग्राहकच मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. यंदा शेतीचा खर्च कमालीचा वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खते व विद्राव्य औषधांच्या दरामध्ये ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गतवर्षी निर्यातक्षम केळी जपण्यासाठी एकरी १ लाख ३० हजार रुपये खर्च येत होता, तो यंदा वाढून थेट २ लाख रुपयांवर पोहोचला आहे.
प्रतिनिधी | वाशिंबे पावसाने ओढ दिल्याने केळीच्या बागा जगवण्यासाठी धडपड सुरू असतानाच बाजारभावातही मोठी घसरण झाली आहे. सुरू केळीला किलोमागे १७ रुपये, तर खोडवा केळीला पाच रुपये दर मिळत असल्याने उत्पादक संकटात सापडले आहेत. पाणीटंचाई, वाढलेला उत्पादन खर्च आणि आखाती देशांत केळी पाठवण्यासाठी निर्माण झालेली अडचण, दुष्काळ जाहीर होऊनही केळी पिकाचे पंचनामे करण्यास महसूल प्रशासनाणे नकार दिला आहे, असा तिहेरी फटका बसत आहे. लागवडीपासून काढणीपर्यंत खते, औषधे, मजुरी, पाणी आणि वाहतूक यांसाठी एकरी सुमारे दोन लाख रुपये खर्च येतो. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे.बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पाण्याअभावी केळीच्या उत्पादनासह फळांच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. केळी उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, पाण्याची कमतरता असल्याने ठिबक सिंचनाद्वारे बागांना पाणी देताना उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत घट झाल्याने काही शेतकऱ्यांना पर्यायी जलस्रोतांचा आधार घ्यावा लागत आहे. पाणी विकत घेणे किंवा टँकरद्वारे पाणी आणणे यांसारखे पर्याय खर्चिक ठरत असल्याने उत्पादन खर्चात आणखी वाढ होत आहे. अशा परिस्थितीत बागा वाचवण्यासाठी शेतकरी आर्थिक ओढाताण सहन करत आहेत.
व्यापारी मातीमोल किमतीने मागतोय दुष्काळात पाण्याचे नियोजन करून आणि मुलाप्रमाणे सांभाळून केळीची बाग उभी केली. पण बाजारात भाव मिळत नाही आणि व्यापारी मातीमोल भावाने माल मागत आहेत. वाहतूक आणि मजुरीचा खर्चही खिशातून भरावा लागत असल्याने, ना ईलाजाने उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. केशव गायकवाड, केळी उत्पादक, माळेगाव ^“वरिष्ठांच्या आदेशानुसार पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानुसार पंचनाम्यांचे काम सुरू आहे. केळी ज्या ठिकाणी अद्याप केळी पिकाचे पंचनामे झालेले नाहीत, त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश दिले जातील.” -शिल्पा ठोकडे, तहसीलदार, करमाळा
आखाती युद्धाचाही फटका, कमी पाण्यामुळे दर्जा खालावला ^आखाती युद्धामुळे केळीला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यातच पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात आली आहेत. केळीचे पीक हिरवेगार दिसत असले, तरी कमी पाण्यामुळे फळांचा दर्जा घसरत असून व्यापारी खरेदी करण्यास तयार नाहीत. दुष्काळ जाहीर होऊनही केळी पिकाचे पंचनामे करण्यास प्रशासन नकार देत आहे,शासनाने केळी पिकाचे सरसकट पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. -गणेश झोळ, केळी उत्पादक, वाशिंबे