Headlines

मोहाडी परिसरात 6 रस्त्यांवर खड्डे; दुरुस्ती न केल्यास धरणे आंदोलन:वाहनधारक त्रस्त; आठ दिवसांत काम सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी‎




तालुक्यातील मोहाडी आणि परिसरातील ५ प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली असून, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. आठ दिवसांत रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य मनोज निकम व ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी आणि खड्डे बुजवण्यासाठी निधीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या टप्प्यात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. मोहाडी कोराटे ते दिंडोरी, मोहाडी ते अकराळे, मोहाडी ते खडक सुकेणे, मोहाडी ते आंबे दिंडोरी, मोहाडी ते साकोरा आणि मोहाडी ते एअरपोर्ट या मार्गांसह परिसरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी डांबर उखडून खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा आकार वाढला असून, वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणेही कठीण झाले आहे. या मार्गांवर दररोज लहान-मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्त्यांची तातडीने डागडुजी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या रस्त्यांचा वापर शेतमालाची वाहतूक करणारे शेतकरी, कामानिमित्त ये-जा करणारे चाकरमानी आणि शाळेत जाणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करतात. मात्र, खड्ड्यांमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचे नुकसान होण्यासह प्रवासाचा वेळ वाढत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *