Headlines

करमाड बाजारात टोमॅटोला प्रतिकिलो 25 रुपयांचा भाव:रोज 50 लाखांची उलाढाल, रोख पेमेंट, चांगला भाव अन् 500 जणांना मिळतोय रोजचा रोजगार‎




दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झालेला असताना, करमाड येथील टोमॅटो उपबाजारपेठ परिसरातील शेतकऱ्यांसह स्थानिक कामगारांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे. टोमॅटोचा हंगाम वर्षातून साधारण चार महिने चालतो. या काळात या बाजारपेठेत दररोज ४० ते ५० लाख रुपयांची मोठी उलाढाल होत असून, सुमारे ५०० जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. रोख पेमेंट, चोख वजन आणि इतर बाजारांच्या तुलनेत मिळणारा चांगला भाव यामुळे जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या बाजारपेठेकडे ओढा वाढला आहे. छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या करमाड उपबाजारपेठेत शनिवारी टोमॅटोला २५ किलोच्या एका क्रेटमागे सरासरी ६२५ रुपयांचा दर मिळाला. सध्या बाजारात दररोज २०० ते २३५ जीप व ट्रॅक्टरच्या माध्यमातून १३ ते १५ हजार क्रेट्सची टोमॅटोची आवक होत आहे. सिल्लोड, बदनापूर, फुलंब्री, भोकरदन, जालना आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकरी आपला माल येथे विक्रीसाठी आणत आहेत. येथून व्यापाऱ्यांमार्फत टोमॅटो दिल्ली, नागपूर, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील प्रमुख बाजारपेठांमध्ये रवाना केला जातो. करमाड बाजारात इतर ठिकाणांपेक्षा जास्त भाव मिळतो. गाडीभाडे थोडे जास्त पडत असले, तरी चांगला दर आणि तात्काळ रोख पेमेंट मिळत असल्याने आम्ही टोमॅटो विक्रीसाठी करमाडलाच प्राधान्य देतो, असे जालन्यातील सामनगाव येथील शेतकरी गोविंद कावले यांनी सांगितले. टोमॅटो विकल्यानंतर लगेच रोख रक्कम हाताशी येत असल्याने दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरळीत होतात. त्यामुळे माल विक्रीसाठी करमाड उपबाजारपेठच सोयीची ठरत असल्याचे छत्रपती संभाजीनगरच्या सेलूद गावातील शेतकरी संतोष व्यवहारे यांनी सांगितले. करमाड उपबाजारपेठेमुळे दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. हंगामी रोजगारातून ५०० कुटुंबांना मिळतो हातभार टोमॅटोच्या चार महिन्यांच्या हंगामात हमाल, वाहनचालक, वाहतूकदार, क्रेट हाताळणारे कामगार आणि व्यापारी अशा विविध घटकांना काम मिळते. सुमारे ५०० कामगारांची उपजीविका या व्यवहारांवर अवलंबून आहे. दुष्काळात शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना या टोमॅटोच्या हंगामी रोजगारामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक हातभार लाभण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांचे हित जपणे हेच आमचे मुख्य ध्येय Ãसध्या दररोज १३ ते १५ हजार क्रेट टोमॅटोची आवक होत आहे. शेतकऱ्यांना योग्य वजन आणि वेळेत पैसे मिळावेत, यासाठी बाजार समिती सतत आडतदारांच्या संपर्कात असून पाठपुरावा करत आहे. शेतकऱ्यांचे हित जपणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. -श्रीराम शेळके, सभापती, उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *