Headlines

लासूरगावला श्री दाक्षायणी देवी मातेची 3 तास घटस्थापनेची पूजा:पहिल्याच दिवशी 11 हजार भाविकांनी घेतले दर्शन‎




वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथील श्री दाक्षायणी देवीची रविवारी सकाळी ९.३० ते १२.३० वाजेपर्यंत तीन तास घटस्थापनेची पूजा करण्यात आली. नवरात्रारंभाच्या शुभमुहूर्तावर मातेला मनमोहक वस्त्रालंकार परिधान करण्यात आले. यानंतर तहसीलदार सुनील सावंत व डॉ. चंद्रमा सावंत यांनी सपत्नीक आरती केली. याप्रसंगी चिरंजीव अनुराग सावंत आणि रुहिणी सावंत उपस्थित होते. श्रीकांत जोशी, श्यामपंत जोशी, नरेंद्र जोशी, गिरीश जोशी, दीपक गुरू लोकाक्षक, केदार जोशी, संतोष जोशी आदी ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात सर्व धार्मिक विधी झाले. दुष्काळी परिस्थितीचे सावट दूर होऊन शेतकरी व सर्वसामान्यांना बळ मिळावे, सर्व इडापिडा टळावी आणि मुबलक पाऊस पडून सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी आर्त प्रार्थना करत तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांनी पत्नी डॉ. चंद्रमा सावंत यांच्यासह शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापनेच्या पहिल्या माळेला देवी दाक्षायणी मातेच्या चरणी साकडे घातले. पहिल्या दिवशी तब्बल ११ हजार भाविकांनी देवी दाक्षायणी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे यांनी दिली. दरम्यान, हिंगोली येथील राज्य राखीव पोलिस दलाची अतिरिक्त ३० कर्मचाऱ्यांची तुकडी तसेच वैजापूर पोलिसांकडून होमगार्डसह ६० पोलिसांचा ताफा तैनात असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी डीवायएसपी विनय सोनवणे यांनी दिली. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नेवासा, श्रीरामपूर, कोळपेवाडी, नांदगाव, वैजापूर, गंगापूर, कन्नडसह विविध भागांतून आलेल्या २५० हून अधिक भाविकांनी मंदिरातील अखंड नंदादीपावरून पायी अनवाणी ज्योत पेटवून नेली. कडेठाण येथे सकाळी ९.३० वाजता विधिवत महापूजा कोल्हापूरच्या अंबाबाईचे उपपीठ मानल्या जाणाऱ्या कडेठाणला नाशिकच्या सप्तशृंगी गडावरून २८४ किमीचा पायी प्रवास करून तरुणांनी ज्योत आणली. घटस्थापना रविवारी सकाळी ९:३० वाजता पार पडली. दरम्यान, दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली असून, परिसरात ३० सीसीटीव्ही बसवण्यात आले असून भाविकांसाठी सावली, पाणी आणि आरोग्य सेवेचे नियोजन आहे. नवरात्रात दररोज विविध अलंकारांतील दर्शन, महाआरती, पालखी सोहळा आणि भजनाचे आयोजन केले आहे. मातेच्या अंगावर अडीच कोटी रुपयांचे दागिने वर्षातील यात्रा आणि नवरात्र उत्सव काळात मातेस १ कोटी १२ लाखांचे पाऊण किलो सोन्याचे दागिने तसेच १ कोटी २६ लाखांचे ५५ किलो चांदीचे सिंहासन, टोप व हार परिधान केले जातात. उत्सव संपताच हे सर्व दागिने तहसीलदार सुनील सावंत यांच्या उपस्थितीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये जमा केले जातात, असे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे यांनी सांगितले. दरम्यान, रविवारी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनीही मातेचे दर्शन घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *