![]()
छत्रपती संभाजीनगरहून लासूरला येण्यासाठी चुकीच्या रेल्वेत बसलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या एका कारागिराने धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला. यात तोल जाऊन पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. तापस डुला (४१, रा. फत्तेपूर, पश्चिम बंगाल, ह. मु. छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव असून, ते लासूरस्टेशन येथील एका सराफा दुकानात कामाला आहेत. संबंधित कारागीर मराठवाडा एक्स्प्रेसऐवजी हिंगोली-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये बसला होता. लासूर गावाजवळील शिवना नदी ओलांडल्यावर गाडी थांबणार नसल्याचे लक्षात येताच त्याने धावत्या गाडीतून उडी मारली. जखमी अवस्थेत तो कालीमाता मंदिराजवळ येऊन कोसळला. पोलिस पाटील बाबासाहेब हरिश्चंद्रे यांनी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना कळवून जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. या मदतकार्यात उपविभागीय अधिकारी पोलिस विनय सोनवणे, बाबासाहेब हरिश्चंद्रे, संतोषकुमार सोमाणी, इर्शाद मिर्झा, तात्याराव गोंडे, कांतीराम शेजूळ, संजय बागुल व महेश कोटकर यांनी सहभाग घेतला.
Source link
धावत्या रेल्वेमधून उतरताना सोनार कारागीर गंभीर जखमी:लासूरगावाजवळील घटना, डोक्याला दुखापत, उपचार सुरू