Headlines

आगीवर सहज नियंत्रण:जामखेडमध्ये आता धावणार "मिनी फायर फायटर'




शहराचा वाढता विस्तार आणि जुन्या भागातील अरुंद रस्ते लक्षात घेऊन जामखेड नगरपरिषदेने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. नगरपरिषदेच्या वतीने नूतन ‘मिनी अग्निशमन व रेस्क्यू’ वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे आता आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळणे सोपे होणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून हे वाहन उपलब्ध झाले असून, नगरपरिषद प्रांगणात नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. नगराध्यक्षा चिंतामणी म्हणाल्या, शहराच्या सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. इमारती कोसळणे, रस्ते अपघात किंवा पूर अशा कोणत्याही संकटात अडकलेल्या नागरिकांना या रेस्क्यू वाहनामुळे तत्काळ मदत पोहोचवता येईल. जामखेड शहराचा विस्तार मोठा आहे, मात्र अनेक ठिकाणी मोठे अग्निशमन बंब पोहोचण्यास अडचणी येतात. हीच अडचण ओळखून मुख्याधिकारी अजय साळवे यांनी मिनी वाहनाची गरज स्पष्ट केली होती. हे वाहन पाणी आणि फोम या दोन्ही माध्यमातून आग विझवण्यास सक्षम असून, कमी जागेतही वेगाने हालचाली करू शकते. मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले, जामखेड शहराचा विस्तार आणि अरुंद रस्त्यांची समस्या लक्षात घेता अशा प्रकारच्या मिनी अग्निशमन वाहनाची गरज होती. हे वाहन पाणी व फोमच्या सहाय्याने आग विझविण्यास सक्षम असून आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देऊ शकते. नगरसेवक अॅड. प्रवीण सानप यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या वाहनामुळे आगीच्या घटनांमध्ये होणारी जीवित व वित्तहानी टाळणे शक्य होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सोहळ्याला मुख्याधिकारी अजय साळवे, अमित चिंतामणी, अर्जुन म्हेत्रे, प्रवीण चोरडिया, मनोज कुलकर्णी, प्रवीण होळकर, अशोक शेळके यांसह नगरपरिषदेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *