Headlines

भाजपमध्ये ‘जुन्यांचा सन्मान’!:बैजयंत पांडा यांच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा अच्छे दिन येणार? सोलेंच्या बंडखोरीनंतर पक्षातील नाराजीची चर्चा




राज्यात एकीकडे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली आहे, तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरांमुळे या निवडणुका प्रस्थापित पक्षांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याचे चित्र आहे. अशातच प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या बड्या नेत्याने बंडखोरी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अनिल सोले यांच्या बंडखोरीच्या मुद्द्यावरून भाजपमधील अनेक जुन्या-जाणत्या नेत्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत आपली नाराजी जाहीर केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षांतर्गत संघटनात्मक बदल करण्याच्या दिशेने पावले उचलल्याची माहिती आहे. पक्षातील जुन्या आणि अनुभवी नेत्यांना पुन्हा महत्त्व देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्याचे समजते. त्यामुळे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा पक्षात महत्त्वाची भूमिका मिळण्याची शक्यता असून, त्यांच्यासाठी ‘अच्छे दिन’ येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ‘मी कोणत्याही जिल्ह्याच्या दौऱ्यावर असेल, तेव्हा पक्षाचे जुने पदाधिकारी, अनुभवी नेते यांची आणि माझी भेट होईल, याची व्यवस्था करा. जुन्यांना सन्मान दिलाच गेला पाहिजे,’ असे मत महाराष्ट्र भाजपचे केंद्रीय प्रभारी बैजयंत पांडा यांनी व्यक्त केले. मुंबईत झालेल्या पहिल्या तोंडओळखीच्या बैठकीत त्यांनी हे मत मांडले. त्यामुळे आता महाराष्ट्र भाजपचे प्रभारी बैजयंत पांडा राज्यातील विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यांदरम्यान पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांच्या आणि अनुभवी नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असून, त्यांची मते जाणून घेणार असल्याचे समोर आले आहे. अनिल सोले यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू नागपूर विधानपरिषद निवडणुकीत अनिल सोले यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न भाजपकडून अद्याप सुरू असल्याचे दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेणार आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे नवे राज्य प्रभारी बैजयंत पांडा यांनी जुन्या आणि अनुभवी नेत्यांना सन्मान देण्याबाबत व्यक्त केलेली भूमिका पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसाठी आश्वासक मानली जात आहे. भाजपमध्ये ‘जुन्यांचा सन्मान’ या भूमिकेला महत्त्व भाजपमध्ये अलीकडेच प्रवेश केलेल्या नेत्यांचे महत्त्व अचानक वाढले असून, आपल्याला पक्षात वाळीत टाकले जात असल्याची भावना जुन्या-जाणत्या नेत्यांमध्ये असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आता पक्षात ‘जुन्यांचा सन्मान’ ही भूमिका पुढे येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा महत्त्व मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *