“हातात संविधानाची प्रत घेऊन फिरणाऱ्या राहुल गांधी आणि विरोधकांकडून आज प्रत्यक्षात संविधानाचा आणि लोकशाहीचा पद्धतशीरपणे गळा घोटण्याचे काम सुरू आहे. आधी शिक्षण व्यवस्था आणि धर्मेंद्र प्रधानांवर निशाणा साधला, मग मतदार यादी शुद्धीकरणाच्या ‘एसआयआर’ (SIR)
.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण दरेकर यांनी विरोधकांच्या आंदोलनांची ‘क्रोनॉलॉजी’ (घटनाक्रम), सुप्रीम कोर्टावरील मोर्चा, लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेवरील टीका, ईव्हीएमचा दुटप्पीपणा, तसेच ठाकरे कुटुंबीयांच्या आंदोलनांवरून विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.
आंदोलनांची क्रोनॉलॉजी समजून घ्या!
राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढताना प्रवीण दरेकर म्हणाले, “संविधानाने लोकशाही बळकट करण्यासाठी ज्या स्वायत्त यंत्रणांची निर्मिती केली, त्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे करून देश पेटवायचा, हा विरोधकांचा एकमेव हेतू आहे. ज्या आंदोलनांना परदेशी फंडिंग, आंतरराष्ट्रीय शक्तींचे पाठबळ आणि डाव्या विचारसरणीच्या मंडळींची फूस आहे, ते सर्व एकत्र येऊन काम करत आहेत.”
टप्प्याटप्प्याने लक्ष्य केले
“पहिल्या टप्प्यात शिक्षण व्यवस्थेवर घाला घालत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला. देशात अशांतता नको म्हणून सरकारने तो विषय हाताळला. त्यानंतर मयत आणि दुबार नावे वगळून मतदार यादी शुद्ध करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या ‘एसआयआर’ला विरोध करत ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचा हट्ट धरला. त्यानंतर एमपीएससी आयोगाला टार्गेट करून विवेक भीमनवारांचा राजीनामा मागितला, जेणेकरून प्रशासकीय अधिकारी बनणाऱ्या तरुण पिढीमध्ये संभ्रम निर्माण व्हावा.”
शेवटची उडी सुप्रीम कोर्टावर
“या सर्व संस्थांना बदनाम केल्यानंतर आता यांची अखेरची छलांग थेट सर्वोच्च न्यायालयावर लागली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात कोणी सुप्रीम कोर्टावर चाल करून जाण्याची भाषा केली नव्हती. सरन्यायाधीश हे प्रशासकीय अधिकारी किंवा मंत्री आहेत का, ज्यांना मोर्चा काढून भेट मागता? न्याय मागायचा असेल तर रिट पिटीशन दाखल करून कायदेशीर लढा द्यायचा असतो.”
मोदींच्या ग्राउंड वर्कशी तुमची तुलनाच अशक्य!
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ऐतिहासिक रथयात्रेवर राहुल गांधींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले, “लालकृष्ण अडवाणींचे वय, त्यांचे राजकारणातील सच्छील चारित्र्य आणि त्यांची विश्वासार्हता याच्याशी राहुल गांधी तुमची पुढच्या 100 जन्मांतही तुलना होऊ शकत नाही. अडवाणींनी जनतेच्या जागरणार्थ रथयात्रा काढली होती. तुमची भारत जोडो यात्रा म्हणजे काही निवडक एनजीओ, ठरावीक विचारसरणीचे लोक आणि कॅमेऱ्यांचा इव्हेंट होता.”

पर्यटकासारखे राजकारण
“महिन्यातील 15 दिवस परदेशात वातानुकूलित खोल्यांमध्ये घालवायचे आणि भारतात येऊन एखाद्या पर्यटकासारखा पिकनिक राऊंड मारून चार पावले चालायचे, म्हणजे ग्राउंडवर असणे नव्हे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 24 तास ग्राउंडवर राहून देशाच्या प्रगतीसाठी घाम गाळत आहेत. भारत आज जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने जात असताना, देशाच्या विकासाला खीळ घालण्यासाठीच आंतरराष्ट्रीय शक्तींच्या इशाऱ्यावर हा विद्रोहीपणा सुरू आहे.”
महाराष्ट्रात जास्त खासदार आले, मग राजीनामे देणार का?
ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांमधील विसंगतींवर बोट ठेवत त्यांनी सुनावले, “निवडणुकीत जनता नाकारते म्हणून आलेले हे फ्रस्ट्रेशन आहे. त्रिपुरामध्ये बॅलेट पेपरवर झालेल्या निकालांवर तुमची काय भूमिका आहे? महाराष्ट्रात लोकसभेला महाविकास आघाडीचे जास्त खासदार आले, ते ईव्हीएममुळेच निवडून आले ना? मग ते सगळे राजीनामे देणार आहेत का? स्वतः आदित्य ठाकरे ज्या ईव्हीएमवर निवडून आले, ते राजीनामा देणार का? सत्ता हवी असेल तर ईव्हीएम चांगले आणि पराभव दिसला की तेच ईव्हीएम वाईट, हा विरोधकांचा दुटप्पीपणा जनतेला चांगलाच ठाऊक आहे.”
राज ठाकरेंची स्वाक्षरी मोहीम निष्फळ
शिवाजी पार्क परिसरातील मनसे आणि ठाकरे गटाच्या आंदोलनांवर भाष्य करताना प्रवीण दरेकर म्हणाले, “राज ठाकरेंनी एकेकाळी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी पहिली मागणी केली होती. आज केवळ आपला पक्ष जिवंत आहे हे दाखवण्यासाठी ते सह्यांची मोहीम राबवत आहेत, या मोहिमेला काडीचाही अर्थ उरलेला नाही.”
“आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून शिवाजी पार्कवर मूक आंदोलन करत आहेत. कारण मोदी सरकारच्या आणि महायुतीच्या विकासाविरोधात बोलण्यासाठी त्यांच्याकडे तोंडात शब्दच उरलेले नाहीत. काहीही मुद्दे नसल्याने त्यांनी हे तोंडाला पट्ट्या बांधण्याचे सोंग आणले आहे. तेजस ठाकरेही आता रस्त्यावर आले आहेत, त्यामुळे ठाकरेंच्या घरातून आणखी एक नवीन राजकारणी सक्रिय झाला एवढेच यातून दिसते.”
अभिजीत दिपके म्हणजे ‘अण्णा हजारे’ नव्हेत
सीजेपीच्या संस्थापकांवर आणि मुंबईतील काँग्रेसच्या आंदोलनावर बोलताना दरेकर यांनी कठोर शब्दांत निशाणा साधला, “अभिजीत दिपके हे आज अण्णा हजारे बनण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. परदेशात शिकून आलेल्या या माणसाने आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेला कधी साधा खडू किंवा डस्टर तरी दिला आहे का? आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील 80 टक्के शाळा उत्कृष्ट शिक्षण देत आहेत. अशा वेळी एका दिवसाचा राऊंड मारून शाळांची बदनामी करायची आणि परदेशी फंडिंगवर स्वतःचे राजकीय पुनर्वसन करायचे, ही भंपक नौटंकी महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही.”
विद्रोह घडवण्याचे प्रयत्न हाणून पाडू
“पुणे, मुंबई, संभाजीनगर ते जंतरमंतरपर्यंत एकाच वेळी संघर्ष पेटवून डोकी फोडणे, रस्ते अडवणे आणि देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण करणे हाच या सर्व डाव्या शक्तींचा कट आहे. मात्र, देशातील १४० कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, अशा कोणत्याही अराजकतेला शांतताप्रिय नागरिक थारा देणार नाहीत,” असा ठाम विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.
———————————————————–
हेही वाचा….
राहुल गांधींसह विरोधकांचा सुप्रीम कोर्टावर मोर्चा: सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचे काम सुरू, CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजधानी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच युवक आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेस पक्ष व इंडिया आघाडीने देखील आंदोलनाला सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयावर इंडिया आघाडीने मोर्चा काढला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी