Headlines

पुणे विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहात दोन विद्यार्थी घुसले:सुरक्षारक्षकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल, विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द; वसतिगृहप्रमुखांचा राजीनामा




सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात शिरणाऱ्या दोन विद्यार्थ्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी प्रमोद राठोड, ओंकार गोरे (दोघे सध्या रा. मुलांचे वसतिगृह, शिक्षणशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विद्यापीठातील सुरक्षारक्षक संपत पाटील (वय ५१) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ११ ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास आरोपी विद्यार्थी मुलींच्या वसतिगृहात शिरले. मुलींच्या वसतिगृहात प्रवेश करण्यास बंदी आहे. रात्रीच्या वेळी दोघे जण बेकायदा मुलींच्या वसतिगृहात शिरले. आरोपींनी मुलींच्या वसतिगृहात घुसखोरी केली, असे सुरक्षारक्षक पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत विद्यापीठातील सुरक्षारक्षकांनी तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहिता कलम ३२९ (१) (बेकायदा प्रवेश करुन धमकाविणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक उमेश कोळी तपास करत आहेत. या घटनेनंतर वसतिगृहातील विद्यार्थिनीशी दोन विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करून विद्यार्थिनींनी सोमवारी पहाटे चतु:शृंगी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विभागातील, वसतिगृहातील प्रवेश रद्द केल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले, तसेच या घटनेची दखल घेऊन वसतिगृहप्रमुखांनी या प्रकरणी राजीनामा दिला. विद्यापीठातच शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनीची अनुचित चौकशी करून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने विद्यार्थिनींनी कुलगुरूंची भेट घेऊन कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *