Headlines

नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार:प्रेमाच्या जाळ्यात ओढून 13 वर्षीय मुलीवर अत्याचार; धर्मांतरासाठीही दबाव, कुटुंबालाही धमक्या




नाशिकमधील उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटक करून आरोपी नोमाण अन्सारी याने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. या अल्पवयीन मुलीवर जाणीवपूर्वक जाळे टाकून तिचे शोषण करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराबाबत पीडित मुलीच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपीला मालेगाव येथून बेड्या ठोकल्या आहेत. धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठण करण्यास भाग पाडले पोलिस तपासात या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी नोमाण अन्सारी याने केवळ अल्पवयीन पीडितेचे लैंगिक शोषणच केले नाही, तर तिचे धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर सातत्याने दबाव टाकला. तिला जबरदस्तीने हिजाब परिधान करायला लावून नमाज पठण करण्यास भाग पाडले. तसेच, या सर्व प्रकारांचे आणि लैंगिक शोषणाचे फोटो व व्हिडीओ त्याने स्वतःच्या मोबाईलमध्ये काढून ठेवले होते. कुटुंबालाही थेट धमक्या आरोपीने हे आक्षेपार्ह फोटो आणि नमाज पठणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला दिली. आरोपीची मजल एवढ्यावरच थांबली नाही, तर त्याने कुटुंबालाही “तुमच्या मुलीशी लग्न करून तिला दिल्लीला घेऊन जाईन आणि तिचे धर्मांतर करेन; तुम्ही विरोध केल्यास तुम्हालाही धर्मांतर करावे लागेल, अन्यथा सर्व फोटो-व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करेन,” अशी थेट धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू या अमानुष आणि गंभीर घटनेमुळे नाशिकमध्ये नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उपनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आता त्याचा आणि पीडित मुलीचा मोबाईल जप्त केला आहे. या प्रकरणामागे आणखी कोणाचा हात आहे का आणि याचे धागेदोरे कुठपर्यंत जोडले आहेत, याचा सखोल तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *