![]()
अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाईची रक्कम दिवाळीपूर्वी थेट बँक खात्यांवर जमा करावी, या मागणीसाठी कळवण येथे महाविकास आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शासनाने तातडीने मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तालुक्यात अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असून, पुढील हंगामाचे नियोजन, शेतीचा खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची प्रक्रिया लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. पंचनाम्यांच्या प्रक्रियेत कोणताही पात्र नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी सरसकट पंचनामे करावेत. नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची नोंद घ्यावी आणि पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या वतीने मांडण्यात आली. दिवाळीचा सण जवळ आला त्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करावी, अशी मागणी मोर्चातून करण्यात आली. या जनआक्रोश मोर्चात संतोष देशमुख, अंबादास जाधव, योगेश गायकवाड, संजय पगार, राम चौरे, प्रभाकर पाटील आदींसह महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. तातडीने निर्णय घ्यावा, ..अन्यथा तीव्र आंदोलन केवळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. शासनाने प्रत्यक्ष मदत देण्यासाठी ठोस पावले उचलून नुकसानभरपाईबाबत तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
Source link
नुकसानभरपाई द्या; कळवणमध्ये महाविकास आघाडीचा जनआक्रोश:सरसकट पंचनामे करून दिवाळीपूर्वी भरपाई जमा करण्याची मागणी